Dailyhunt
दानशूर उद्योजक बिल गेट्स

दानशूर उद्योजक बिल गेट्स

विलिम हेनरी गेट्स उर्फ बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. ते दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर 1955 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील सीयाटल येथे झाला.

त्यांचे वडील विलियम एच गेट्स हे सुप्रसिद्ध वकील होते व त्यांची आई मेरी मॅक्सवेल या युनायटेड वे आणि फर्स्ट इंटरस्टेट बँक सिस्टमच्या बोर्ड्स ऑफ डायरेक्टरर्समधील एक होत्या. बिल गेट्स हे बालपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि विलक्षण प्रतिभेचे धनी होते. सुरुवातीपासूनच त्यांना अभ्यासाची फार आवड होती त्यामुळे ते तासंतास घरात एकटेच अभ्यास करत असत. 1968 साली त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचा दाखला लेकसाइट या खासगी शाळेत करून दिला.

सुरुवातीला बिल गेट्स सर्वच विषयांमध्ये पारंगत होते, पण त्यांचे गणित आणि विज्ञान हे विषय सर्वोत्तम होते. शाळेतल्या इतर गोष्टींमध्ये देखील ते हिरीरीने सहभागी होत असत. शाळेतल्या विद्यार्थ्यांना जेव्हा कॉम्प्युटर शिकविला जात होता तेव्हापासून बिल गेट्स यांची रुची संगणकात वाढू लागली, ते आपला जास्तीत-जास्त वेळ कॉम्प्युटर समवेत घालवू लागले. पुढे वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी बिल गेट्स प्रोग्रामिंगमध्ये तरबेज झाले आणि एक सॉफ्टवेअर प्रोग्राम म्हणजेच प्रोग्रामिंग कॉम्प्युटरदेखील बनविला.

शालेय जीवनात असतानाच बिल गेट्स कम्प्युटर बनविण्यात तरबेज झाले होते, वयाच्या जेमतेम 20 व्या वर्षी आपला मित्र पॉल एलन समवेत 1975 साली त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. आज ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी झाली आहे. 10 नोव्हेंबर 1983 ला बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट विंडोजची घोषणा केली आणि त्यानंतर दोन वर्षांनी 1985 ला मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केली. मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममुळे यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली. 2014 साली त्यांनी कंपनीच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आणि मायक्रोसॉफ्टच्या सीईओचे एडव्हायजर म्हणून काम करू लागले. त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णतः दीन, गरजवंत, असहाय लोकांच्या मदतीकरता आणि समाजसेवेकरिता समर्पित केले.

बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी 2000 साली गरीब, असहाय्य आणि गरजवंतांच्या मदतीकरता बिल गेट्स आणि मेलिंडा फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांचे हे फाऊंडेशन विश्वातील सर्वात मोठ्या चॅरिटी संस्थानांपैकी एक आहे. या व्यतिरिक्त 2010 साली बिल गेट्स यांनी मार्क जूकरबर्ग यांच्या समवेत मिळून एक करार केला. या करारानुसार ते आपल्या मिळकतीचा अर्धा भाग दान करतील. शिवाय दरवर्षी भारतात येऊन ते भारतातील गरीब मुलांना मदत करतात. 2010 साली बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मिलिंडा यांना ते भारतातील मुलांना करीत असलेल्या सहाय्याकरीता भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar