मुंबई : चेंबूर वृक्ष दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवर्षी झाडाच्या फांद्या कोसळून तसेच झाडे पडून लोकांचे जीव जात आहेत. मात्र, याकडे मुंबई महापालिका प्रशासन अजून गांभीर्याने पाहात नाही.
त्यामुळे महापालिका अधिकारी जबाबदारी न घेता केवळ जाणाऱ्या जीवांची मोजणी करण्यासाठी बसले आहेत का, असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत. 30 जून 2026 रोजी चेंबूरमधील वृक्ष दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईकर संतप्त झाले असून याला जबाबदार कोण, असा सवाल करत आहेत. एक बळी गेल्यानंतर समिती नेमून जाणारा जीव परत येणार आहे का, अशा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर मिळालेली आकडेवारी खूपच धक्कादायक आहे.
चेंबूरमधील 30 जूनची दुर्घटना ताजी आहे. मात्र, अशा दुर्घटना यापूर्वी घडल्या असून महापालिका अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच वारंवार अशाच पद्धतीच्या दुर्घटना घडत आहेत. मुंबईत तीन वर्षांत झाडे कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 125 जण जखमी झाले आहेत. याचाच अर्थ लोकांचे जीव जात असूनही महापालिका अधिकारी अशा दुर्घटनांबाबत अजिबात गंभीर नाहीत, असा होतो. चेंबूरमधील दुर्घटना प्रकरणी महापालिकेने 1 जुलै रोजी तीन अधिकारी निलंबित केले आहेत. यात महापालिकेने उद्यान आणि वृक्ष विभागाचे सहाय्यक अधीक्षक, महापालिकेच्या रस्ते विभागातील उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांचा समावेश आहे. तर या प्रकरणी नियुक्त समिती 8 दिवसांत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना अहवाल सादर करणार आहे.
झाडे का उन्मळून पडत आहेत?
मुंबईतील झाडे पडण्याच्या घटना लक्षात घेतल्या तर त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. झाडे का उन्मळून पडत आहेत? झाडांची मुळे बाहेर येत आहेत की झाडांना मारण्याचा प्रयत्न होत आहे, ही माहिती समोर येणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जासारख्या मुंबईत तीन वर्षांत 13 जणांचा झाड कोसळून मृत्यू होत असेल तर ही बाब खूप गंभीर आहे. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, याचा अभ्यास करण्याऐवजी महापालिकेचे अधिकारी शांतपणे दरवर्षी उन्मळून पडणारी झाडे आणि जाणाऱ्या बळींचा रेकॉर्ड ठेवण्यात धन्यता मानत आहेत.
30 जून रोजी काय घडलं?
मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात मंगळवारी 30 जून रोजी जोरदार पाऊस कोसळत होता. त्या दिवशी मुंबई शहरात सहा, पूर्व उपनगरात 11 आणि आणि पश्चिम उपनगरात 13 म्हणजे 30 ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी दरवर्षी मुंबई महापालिकेकडून आधी आणि पावसाळ्यानंतर वृक्ष छाटणी केली जाते. यंदा 31 मेपर्यंत 84 हजार 819 झाडांची छाटणी होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात 67 हजार 274 झाडांची छाटणी झाली. तर धोकादायक वृक्षांच्या सर्वेक्षणात 387 पैकी 369 झाडे हटवण्यात आली आहेत.

