वसई : 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक असल्याने वसई-विरार परिसरातील अमराठी रिक्षाचालक मोठ्या संख्येने मराठी शिकण्यासाठी पुढे येत आहेत. गेल्या दोन महिन्यात सात हजारांहून अधिक चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून उर्वरित चालकांसाठीही प्रशिक्षण केंद्रांमध्ये गर्दी वाढू लागली आहे.
मराठी भाषेत प्रवाशांशी सहज संवाद साधता यावा आणि शासनाने दिलेल्या मुदतीचे पालन करता यावे यासाठी वसई-विरारमधील अमराठी रिक्षाचालकांचा मराठी भाषा शिकण्याकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. 15 ऑगस्ट ही अंतिम मुदत आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रशिक्षण केंद्रांमध्ये चालकांची उपस्थिती लक्षणीय वाढल्याचे चित्र दिसत आहे.
राज्य शासनाने मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांना मराठीचे मूलभूत ज्ञान देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ जूनपासून राज्यभर मराठी भाषा प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये रिक्षाचालकांना दैनंदिन व्यवहारात आणि प्रवाशांशी संवाद साधताना उपयोगी पडतील असे मराठीतील शब्द, वाक्ये आणि संभाषणाची पद्धत शिकवली जाते.
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरात स्थलांतरित रिक्षाचालकांची संख्या मोठी असल्याने या भागात अनेक प्रशिक्षण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या प्रतिसादामुळे काही ठिकाणी अतिरिक्त वर्गही सुरू करण्यात आले आहेत, जेणेकरून अधिकाधिक चालकांना वेळेत प्रशिक्षण पूर्ण करता येईल.
हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून प्रत्येक रिक्षाचालकाने चार तासांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर तोंडी परीक्षेद्वारे चालकांची मराठीतील संवाद क्षमता तपासली जात आहे. गेल्या दोन महिन्यांत वसई- विरारमधील सात हजारांहून अधिक रिक्षाचालकांनी प्रशिक्षण पूर्ण करून तोंडी परीक्षाही दिली असल्याची माहिती प्रशिक्षकांनी दिली.
दरम्यान, प्रशिक्षणाची अंतिम मुदत जवळ आल्याने अद्याप प्रशिक्षण न घेतलेल्या चालकांनीही मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. परवाना किंवा पुढील प्रशासकीय कारवाईबाबतकोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच प्रवाशांशी स्थानिक भाषेत संवाद साधता यावा, या उद्देशाने अनेकचालक आता स्वयंस्फूर्तीने मराठी शिकण्यासाठी पुढे येत आहेत.
मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने येत्या काळात प्रशिक्षण केंद्रांवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनीही अधिकाधिक चालकांना वेळेत प्रशिक्षण देता यावे यासाठी आवश्यक तयारी सुरू ठेवली आहे.

