नवी दिल्ली : जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आणि आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
परंतु, या आंदोलनाबाबत आणि नीट पेपरफुटीबाबत खासदार राघव चढ्ढा यांनी काहीच भाष्य केले नाही. त्यामुळे आंदोलनादरम्यान जेन झींनी चढ्ढा यांच्यावरही मिम्स तयार करून त्यांचे पोस्टर आंदोलनात झळकवले होते. तर सोशल मीडियावरही जेन झींनी खासदार चढ्ढा यांना लक्ष्य केले. ज्यानंतर आता संसदेत भाष्य करताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आणि त्यांच्या बदलेल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले आहे. आता माझी भूमिका बदलली आहे, असे म्हणत खासदार राघव चढ्ढा यांनी या प्रकरणावर सरकारची बाजू मांडली आहे. raghav chadha on paper leak
पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी याचवर्षी एप्रिलमध्ये आम आदमी पार्टी सोडून इतर सहा खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये सहभागी झाल्यापासून राज्यसभेत बोलण्याची ही त्यांची पहिलीच संधी होती. त्यामुळे गुरुवारी (30 जुलै) मिळालेल्या पहिल्या संधीतच त्यांनी आपल्या पक्षाची बाजू जोरदारपणे मांडली. लोकसभेनंतर, राज्यसभेतही "सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026" बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकात प्रश्नपत्रिका फुटल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. त्यामुळे या विधेयकातील चर्चेत राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी भाग घेतला होता. त्यांनी हे विधेयक तरुणांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले आणि त्याला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी आंदोलन करत आहेत, तर विरोधी पक्ष केवळ राजकीय फायद्यासाठी त्यांना पाठिंबा देत आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
आता माझी भूमिका बदलली…
तर, नीट पेपरफुटीवर मी गप्प का होतो? असा प्रश्न अनेकांनी मला विचारला. तुम्ही नीट पेपरफुटी प्रकरणावर कधी बोलणार?" असेही विचारण्यात आले. तर माझे म्हणणे इतकेच आहे की, "पूर्वी, जेव्हा मी विरोधी पक्षात होतो, तेव्हा प्रश्न विचारणे हे माझे काम होते आणि मी ते प्रामाणिकपणे केले. आता मी सत्ताधारी पक्षात असल्याने माझी भूमिका बदलली आहे. आता माझी जबाबदारी प्रश्न विचारण्याची नाही, तर लोकांना समाधान मिळावे अशी उपाययोजना करणे आहे, म्हणूनच आम्ही ठरवले होते की, जेव्हा आम्हाला या समस्येवर तोडगा सापडेल, त्याच दिवशी मी बोलेन आणि अखेर आज तोच दिवस आहे. आज आमच्या सरकारने या समस्येवर उपाय शोधून काढला आहे. मीही कॅमेऱ्यासमोर बोलू शकलो असतो, पण मी ते केले नाही, असे चढ्ढा यांनी स्पष्टपणे सांगितले.
तसेच, पेपरफुटीसारख्या गंभीर आजारावर कायमस्वरूपी इलाज हवा. ज्याप्रमाणे क्रोसिन देऊन कर्करोग बरा होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे पेपरफुटीसारख्या समस्येवर माध्यमांतील छोट्या-छोट्या बातम्यांनी नव्हे, तर एका संस्थात्मक उपायाने तोडगा काढला जाईल, तोच तोडगा आमचे सरकार आज या विधेयकाद्वारे काढणार आहे, जे भारतातील पहिले पेपरफुटी विरोधी विधेयक आहे. तर, विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे, राजकीय पक्षांना फुटेज हवे आहे, विद्यार्थ्यांना परीक्षा सुरक्षितपणे हव्या आहेत, राजकीय पक्षांना व्हायरल क्लिप्स हव्या आहेत. विद्यार्थ्यांची चिंता भविष्याबद्दल आहे आणि राजकारण्यांचे आडाखे पुढच्या निवडणुकीसाठी आहेत. त्यामुळे, मी विरोधी पक्षांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्या राजकीय प्रचारासाठी विद्यार्थ्यांच्या भावनांचा गैरवापर करू नये. ही लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस अशी नाही, तर गुणवत्ता विरुद्ध माफिया आणि मेहनत विरुद्ध सेटिंग अशी आहे, असे म्हणत राघव चढ्ढा यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

