Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अखेर वैभव सूर्यवंशी विक्रमादित्य, सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मोडला

अखेर वैभव सूर्यवंशी विक्रमादित्य, सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मोडला

मुंबई : आयपीएल 2026 मधील आपल्या आक्रमक फलंदाजीने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना थक्क करणाऱ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक पदार्पण केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने क्रिकेटचा देव अर्थात दिग्गज सचिन तेंडुलकरचा 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

अवघ्या 15 वर्षे 99 दिवस वयात भारताचे प्रतिनिधित्व करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यात आली होती. मात्र आयर्लंड दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली नाही. त्यामुळे भारतीय संघाला 2-0 ने टी-20 मालिका गमवावी लागली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली नाही. मात्र सलामीवीर संजू सॅमसन आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला संधी देण्याची मागणी जोर धरत होती. अखेर वैभव सूर्यवंशीला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे. मात्र यामुळे सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे.

भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम दीर्घकाळ सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमधून वयाच्या 16 वर्षे 205 व्या दिवशी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. आता वैभव सूर्यवंशीने त्याहूनही कमी वयात भारतीय संघाची जर्सी परिधान करून इतिहास रचला आहे. या यादीत माजी फिरकीपटू पियुष चावला तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने वयाच्या 17 वर्षे 75 व्या दिवशी भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते.

भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारे सर्वात तरुण खेळाडू

वैभव सूर्यवंशी - 15 वर्षे 99 दिवस (टी-20)
सचिन तेंडुलकर - 16 वर्षे 205 दिवस (कसोटी)
पियुष चावला - 17 वर्षे 75 दिवस (कसोटी)

आयपीएलमध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना

आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी आणि मॅट हेन्री यांसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध न घाबरता आक्रमक फलंदाजी केली आहे. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट 239.11 होता, तर फिरकी गोलंदाजांविरुद्धही त्याने 228 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. जवळपास प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध आक्रमक फलंदाजी ही त्याची भूमिका स्पष्ट होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar