मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (वय 89) यांना सोमवारी (31 ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास मुंबईतील 'बॉम्बे हॉस्पिटल'च्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचा संशय आहे.
सुरुवातीला त्यांना राळेगण सिद्धी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र नंतर त्यांच्या शरीरातील 'क्रिएटिनिन'ची पातळी वाढल्याचे (जे मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांचे लक्षण आहे) दिसून आल्यावर त्यांना रस्तेमार्गाने मुंबईला आणण्यात आले.
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे असा त्रास होत होता. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही, तसेच आजारपणामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणाही जाणवत होता. त्यामुळे अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांनी तातडीने मुंबईत रुग्णालयात हलवण्यात आले.
अण्णा हजारे यांच्यावर उपचार करणारे डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले की, विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जात असल्या तरी, त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. त्यांना तीव्र डिहायड्रेशनचा त्रास होत असून, त्यांचे मूत्रपिंड निकामी होण्याची (किडनी फेल्युअर) लक्षणेही दिसून येत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
रुग्णवाहिकेद्वारे अण्णा हजारे यांना मुंबईत आणले
अण्णा हजारे यांच्यावर सुरुवातीला त्यांच्या मूळ गावी म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धीजवळील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या एका विशेष पथकाने त्यांना रुग्णवाहिकेद्वारे मुंबईत आणले. अण्णा हजारे मागील काही काळापासून प्रकृतीच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कमी सक्रिय दिसायचे. दरम्यान, अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरातून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.

