Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बैलजोडीची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर; पोळ्याच्या मुहूर्तावर 'जोडी'ची घोषणा

बैलजोडीची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर; पोळ्याच्या मुहूर्तावर 'जोडी'ची घोषणा

शेतकऱ्याच्या जीवनात बैलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीच्या कामात शेतकऱ्याचा खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या दिवशी बैलांना आंघोळ घालून, सजवून त्यांची पूजा केली जाते. शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते, कष्ट आणि मातीशी असलेली नाळ या परंपरेतून अधोरेखित होते. याच भावनिक नात्याला केंद्रस्थानी ठेवत पोळ्याचा मुहूर्त साधून एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!' या आशयाच्या टॅगलाइनसह 'जोडी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फायनल ड्राफ्ट फिल्म प्रॉडक्शन आणि फेबलफॉक्स मीडिया प्रॉडक्शन यांच्या निर्मितीचा 'जोडी' हा चित्रपट ज्ञानेश्वर शांताराम जाधव यांनी लिहिला असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेसोबत प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरने या कलाकृतीची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टरमध्ये हिरवाईने नटलेल्या शेतातून बैलजोडी नांगर ओढत पुढे जाताना दिसते. त्याच दृश्याच्या पार्श्वभूमीवर आकाश, शेतजमीन आणि आधुनिक शेतीचे प्रतीक असलेले ट्रॅक्टर दिसत असल्याने बदलत्या काळाची झलकही पोस्टरमधून पाहायला मिळते.

पोस्टरवर 'काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!' ही ओळ ठळकपणे झळकते. त्यामुळे बदलत्या शेतीपद्धती आणि तंत्रज्ञानाच्या काळातही शेतकरी आणि बैलजोडी यांच्यातील भावनिक नातं अबाधित राहणार असल्याचा आशय यातून सूचित होतो. चित्रपटातून बैलजोडी आणि त्यांच्या मालकाच्या नात्याचा वेगळा, भावस्पर्शी पैलू उलगडण्यात येणार आहे.

'एक नातं… एक परंपरा… आणि त्यामागची मनाला भिडणारी गोष्ट' अशी या चित्रपटाची संकल्पना असल्याचे पोस्टरवरून जाणवते. ऑगस्ट २०२७मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही पोस्टरवर नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन, शेती आणि माणूस-बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते मोठ्या पडद्यावर कसे रंगते, याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar