Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताच्या औद्योगिक विकासाची एचएमटीच्या रुपाने पायाभरणी

भारताच्या औद्योगिक विकासाची एचएमटीच्या रुपाने पायाभरणी

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 1955 रोजी हिंदुस्तान मशीन टूल्स (एचएमटी) या कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. हा भारतीय औद्योगिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे देशाला स्वावलंबी बनवणे. गांधीजींचा भर ग्रामोद्योग आणि छोट्या उद्योगांवर होता, तर नेहरूंचा विचार होता की भारताने आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवजड उद्योगांच्या आधारावर जगाशी स्पर्धा करायला हवी. धरणे, पोलाद कारखाने, आणि यंत्र बनवणारी यंत्रे - म्हणजेच मशीन टूल्स - हे नेहरूंच्या मते आधुनिक भारताची मंदिरे होती. या पार्श्वभूमीवर 1949 मध्ये केंद्र सरकारने स्वित्झर्लंडच्या ओर्लिकॉन कंपनीच्या सहकार्याने बेंगळुरू येथे हिंदुस्तान मशीन टूल्सची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

1953 मध्ये कंपनीची नोंदणी झाली आणि 5 ऑक्टोबर 1955 रोजी पंडित नेहरूंनी प्रत्यक्ष उत्पादन कारखान्याचे उद्घाटन केले. सुरुवातीला या कारखान्यात लेथ मशीनसारखी अवजड यंत्रे बनवली जात होती. एचएमटीचे महत्त्व केवळ एका कारखान्यापुरते नव्हते. ज्या देशात सुईसुद्धा आयात करावी लागत होती, त्या देशात स्वत:ची यंत्रे तयार होऊ लागली.

यामुळे भारताच्या संरक्षण, अभियांत्रिकी, रेल्वे आणि लघुउद्योगांना लागणारी यंत्रसामग्री देशातच मिळू लागली. परकीय चलन वाचले आणि तांत्रिक कौशल्य वाढले. पुढे एचएमटीने आपला विस्तार केला. बेंगळुरू पाठोपाठ पिंजोर (हरियाणा), कालामासेरी (केरळ), श्रीनगर, हैदराबाद अशा पाच ठिकाणी त्याचे कारखाने निघाले.

साठ आणि सत्तरच्या दशकात एचएमटी केवळ मशीन टूल्स पुरती मर्यादित न राहता घड्याळे, ट्रॅक्टर, बेअरिंग आणि छपाई यंत्रेही बनवू लागली. एचएमटीचे घड्याळ तर त्या काळात मध्यमवर्गीय भारतीयाच्या हातावरची शान आणि अचूकतेचे प्रतीक बनले होते. एकेकाळी एचएमटीमध्ये वीस हजारांहून अधिक कामगार काम करत होते.1955 चे ते उद्घाटन हे केवळ एका कंपनीचे उद्घाटन नव्हते, तर तो नेहरूंच्या मिश्र अर्थव्यवस्थेच्या आणि सार्वजनिक क्षेत्राच्या स्वप्नाचा पाया होता. खासगी क्षेत्राला लगेच अवजड गुंतवणूक करणे शक्य नव्हते, म्हणून सरकारने स्वत: पुढाकार घेऊन पायाभूत उद्योग उभे केले. काळाच्या ओघात जागतिक स्पर्धा, तंत्रज्ञानातील बदल आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे एचएमटीला उतरती कळा लागली, तरी भारतीय औद्योगिकीकरणाच्या पहिल्या पर्वात त्याने दिलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही. आज भारत मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, त्याचे मूळ बेंगळुरूत एचएमटीच्या रुपाने पेरले गेले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar