मुंबई : मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात एक अनपेक्षित प्रसंग घडला. भाषण करत असताना अमित ठाकरे अचानक काही क्षणांसाठी थांबले., "मला काय बोलायचं सुचत नाही..
मी परत येतो," असे म्हणत त्यांनी व्यासपीठ सोडले. काही वेळाने ते पुन्हा मंचावर आले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपले भाषण पूर्ण केले. या घटनेची कार्यक्रमस्थळी आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली.
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही सुरुवात करण्यात आली. अलीकडेच झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
भाषणाला सुरुवात करताना अमित ठाकरे यांनी अलीकडील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचे कौतुक केले. आंदोलनाच्या माध्यमातून मोठा निर्णय घडवून आणणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी टाळ्यांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय प्रवासबद्दलही स्पष्टपणे मत व्यक्त केले. "मी राजसाहेबांचा मुलगा नसतो, तर कदाचित राजकारणात आलोच नसतो. हे मी नेहमी जाणीवपूर्वक सांगतो. पण केवळ त्यांचा मुलगा असल्यामुळे नाही, तर ते प्रामाणिक आहेत म्हणून मी त्यांच्यासोबत उभा आहे. त्याचबरोबर तुमच्यासारखे सहकारी मिळाले नसते, तर मी राजकारणात टिकूही शकलो नसतो," असे अमित ठाकरे म्हणाले.
अचानक थांबले आणि व्यासपीठ सोडले..
यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. "आतापर्यंत केलेली आंदोलने विसरून नव्याने सुरुवात करायला हवी. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. आता वेगळे विषय हाताळण्याची गरज आहे," असे ते बोलत असतानाच अचानक काही क्षण थांबले. याचवेळी त्यांनी "मला काय बोलायचं सुचत नाही… मी परत येतो," असे सांगत व्यासपीठ सोडले. त्यांच्या या अचानक झालेल्या विरामामुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली. उपस्थितांमध्येही नेमके काय झाले, याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र काही वेळानंतर अमित ठाकरे पुन्हा मंचावर परतले आणि त्यांनी भाषण पुढे सुरू केले. यावेळी त्यांनी आपण कोणतेही भाषण पाठ करून आलेलो नसल्याचे सांगितले. "तुम्हा सर्वांना पाहिल्यावर धडकी भरली. माझ्या मागे कार्यकर्त्यांची ताकद आणि राजसाहेब ठाकरे यांचे पाठबळ असल्यामुळेच माझ्यात आत्मविश्वास आहे," असे ते म्हणाले.
अलीकडील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी आंदोलनावेळी विद्यार्थ्यांना मदत केल्याचा संदर्भ दिला. त्या काळात पोलिसांची भूमिका आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचाही त्यांनी उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत सरकारवर टीका केली.
मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे आणि निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी अपेक्षित काम केले नाही, तर त्यांना बदलण्याचा अधिकार जनतेकडे आहे, असेही अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी सदस्य नोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याशी भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. "जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचे राजसाहेबांचे स्वप्न आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी विद्यार्थी संघटना उभी करायची आहे. त्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे," असे आवाहन करत अमित ठाकरे यांनी आपले भाषण पूर्ण केले.

