ठाणे : ठाण्यातील भिवंडीमध्ये गुरुवारी (30 जुलै) मध्यरात्री एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, शुक्रवारीही (31 जुलै) बचावकार्य सुरु असून अद्याप काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात यश आल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले असून स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडूनही बचावकार्यात मदत केली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील नारपोली गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट असे या इमारतीचे नाव असून ही इमारत आधीच धोकादायक इमारतीच्या क वर्गात असल्याचे घोषित केले होते. या इमारतीमधून काहीजण समान काढण्यास गेल्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. Bhiwandi building collapse
भिवंडी येथील नारपोली भागातील गंगाराम वाडी परिसरातील कोहिनूर या चार मजली इमारतीचा काही भाग पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. गुरुवारी (30 जुलै) मध्यरात्री 11.30 ते 12 वाजतादरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 6 ते 7 जण अडकले, त्यांच्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्यापही बचावकार्य सुरु असून घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून गेले. इमारतीपर्यंत पोहचण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने बचावकार्यात अनेक अडथळे येत असल्याचे साग्न्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत 2007 मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये दोन अपार्टमेंट असून एका अपार्टमेंटमध्ये 15 अशा एकूण 30 खोल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम कमकुवत असल्याने ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत सुरुवातीपासूनच कमकुवत होती. गुरुवारी, या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात होती. या दुरुस्तीच्या कामामुळे संध्याकाळी 6 नंतर इमारतीला तडे जाण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे, रात्री 8 वाजण्याच्या सुमारास इमारत झुकत असल्याची माहिती मिळताच पालिका प्रभाग समिती 4 चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी ही इमारत निर्मनुष्य केली. पण, तळमजल्यावरील दुरुस्ती काम सुरू होते. तेव्हा त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील काही सदस्य आपले साहित्य घेण्यासाठी इमारतीमध्ये गेले होते. त्याचवेळी इमारत कोसळली आणि आतमध्ये गेलेले लोकं ढिगाऱ्याखाली अडकले.

