Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये एफडीएची धाड; महापालिकेकडूनही 50 हजारांचा दंड

बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये एफडीएची धाड; महापालिकेकडूनही 50 हजारांचा दंड

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये अस्वच्छता असून ताकात माशी पडलेली दोन दिवसांपूर्वीच आढळून आली होती. महत्त्वाचे या घटनेपूर्वी कांदा भाजीत देखील प्लास्टिक गोणीचा धागा आढळून आला होता.

या दोन्ही घटनांची दखल घेत 'एफडीए'च्या पथकाने आज सदर कॅन्टीनमध्ये धाड टाकून झाडाझडती घेतली. तर, महापालिकेकडून देखील कॅन्टीन चालकाला 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या केईएम रुग्णालय आवारातील कॅन्टीनवर देखील 'एफडीए' च्या पथकाने धाड टाकून झाडाझडती घेतली होती. तसेच, त्या कॅन्टीन चालकाचा परवाना देखील रद्द केला होता.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये अस्वच्छता असते. खाद्यान्न झाकलेले नसते. त्यावर माशा बसतात. खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे सोमवारी कॅन्टीनमध्ये ताकात माशी पडलेली आढळून आली होती. 3 जुलै रोजी देखील कांदा भजीमध्ये गोणीचा धागा आढळून आला होता. या घटनांबाबत वृत्तपत्रात, वृत्तवाहिन्यांवर वृत्त झळकल्यानंतर 'एफडीए'च्या पथकाने आज सदर कॅन्टीनमध्ये धाड टाकून झाडाझडती घेतली. मात्र अद्यापपर्यंत सदर प्रकरणात काय कारवाई करण्यात आली याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र 'एफडीए'च्या पथकातील अधिकारी कॅन्टीनमध्ये पाच तास ठाण मांडून बसल्याचे सांगण्यात येते.

बीएमसीकडून कॅन्टीन चालकाला दंड

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य खात्याने तसेच कामगार खात्याकडून यापूर्वी घडलेल्या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेण्यात आली असून या दोन्ही खात्याकडून प्रत्येकी 25 हजार रुपये दंड याप्रमाणे एकूण 50 हजार रुपये दंड कॅन्टीन चालकाला ठोठावण्यात आल्याचे समजते. मात्र अद्याप 'एफडीए'ची कारवाई प्रलंबित आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar