Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीएमसीमधील अभियंत्यांना सहाय्यक आयुक्तपदाची लॉटरी; डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांची उपायुक्तपदी नियुक्ती

बीएमसीमधील अभियंत्यांना सहाय्यक आयुक्तपदाची लॉटरी; डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांची उपायुक्तपदी नियुक्ती

मुंबई : मुंबईत सध्या पावसाळ्याचे वातावरण असताना महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशाने आज काही सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच, एका सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त (हंगामी) पदावर प्रमोशन देण्यात आले आहे.

तसेच एका अभियंत्याला प्रमोशन देत सहाय्यक आयुक्त पदावर वर्णी लावण्यात आली असून आणखीन एका अभियंत्यांकडे सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्याने आता त्या सहाय्यक आयुक्तांना दुसऱ्या प्रभागातील पावसाळी परिस्थिती, नागरी समस्या, चालू आणि प्रस्तावित विकास कामे आदींचा अभ्यास करावा लागणार आहे. सहाय्यक आयुक्तांच्या बदलीमुळे तेथील स्थानिक नगरसेवकांच्या विविध प्रस्तावित, चालू कामांवर देखील कमी-अधिक प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, मालमत्ता विभाग सांभाळणारे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रमोशन देण्यात आले असून त्यांची हंगामी उपायुक्त म्हणून मध्यवर्ती खरेदी खाते या विभागत वर्णी लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, अलका ससाणे सहाय्यक आयुक्त (बाजार) व सहाय्यक आयुक्त "सी" प्रभाग (अतिरिक्त कार्यभार) यांची सहाय्यक आयुक्त एम/पूर्व या प्रभागात बदली करण्यात आली आहे. गजानन बेल्लाळे सहाय्यक आयुक्त "ए" विभाग व कर निर्धारण आणि संकलक (अतिरिक्त कार्यभार) यांच्याकडे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडील मालमत्ता विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, उज्वला इंगोले सहाय्यक आयुक्त एम/पूर्व व सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) कार्यभार यांच्याकडे सहाय्यक आयुक्त "ए" प्रभाग जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

योगिता कोल्हे सहाय्यक आयुक्त टी प्रभाग यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन पूर्व उपनगरे (अतिरिक्त कार्यभार) सोपविण्यात आला आहे. स्वप्नजा क्षीरसागर सहाय्यक आयुक्त जी/दक्षिण यांच्याकडे कर निर्धारक व संकलक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, सुनील माने, कार्यकारी अभियंता (प्रमुख कामे) जलकामे, जल अभियंता खाते यांच्याकडे सहाय्यक आयुक्त "सी" प्रभाग, पूर्ण कालिक कार्यभार, सहाय्यक आयुक्त (बाजार) अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. वनिता कोकाटे कार्यकारी अभियंता व उप प्रमुख अभियंता (पजवा) खाते यांच्याकडे सहाय्यक आयुक्त के/दक्षिण पूर्ण कार्यभार सोपविण्यात आला आहे. जयदीप मोरे कार्यकारी अभियंता घनकचरा व्यवस्थापन यांच्याकडे सहाय्यक आयुक्त "एन" घाटकोपर प्रभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar