मुंबई : अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आणि 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. 17 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा ही धमकी देण्यात आली होती.
त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेल्या कॉलमध्ये, फोन करणाऱ्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा करत पैसे न दिल्यास पठाण यांनाही ठार मारण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर आता पुन्हा आमदार साजिद पठाण यांना याच गँगकडून धमकी देण्यात आली. याबाबतची माहिती काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी (2 जुलै) स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विधानसभेत दिली. मात्र, यावेळी मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस आमदारांविरोधात उभे राहात सरकार याबाबतची कारवाई करणार असून विरोधक या गोष्टीचे राजकारण करू पाहात असल्याचे म्हटले. ज्यानंतर या मुद्द्यावरून मंत्री नितेश राणे विरुद्ध काँग्रेस आमदार अशी खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांचा स्थगन प्रस्ताव मांडले. पहिल्या स्थगनच्या माध्यमातून त्यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघात एकाच दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर पटोलेंनी त्यांच्या पक्षातील आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून सलग दुसऱ्यांदा धमकीचा फोन आल्याची माहिती दिली. ही गंभीर बाब असून यामधून सरकारची असर्थता समोर येत आहे. आमदार सुरक्षित नाहीये, असे यावेळी पटोलेंनी सांगितले.
याच मुद्द्यावरून काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार सुद्धा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी याबाबत म्हटले की, दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, हे काय भूषणावह आहे का? अधिवेशन सुरू असताना बिश्नोई गँगचा म्होरक्या फोन करून धमकी देतो. साजिद पठाण यांनी पहिल्यांदा आलेल्या धमकीवेळी ज्या नंबरवरून फोन आला तो नंबर ब्लॉक केला. त्यानंतर आता त्यांनी साजिद पठाण यांच्या नगरसेवकाला फोन करून धमकी दिली. ही काल आलेली धमकी आहे. याचा संपूर्ण ऑडिओ रेकॉर्ड आहे. पैसे दिले नाही तर संपवून टाकू, अशी धमकी देण्यात येते. हे सरकार कोणाला पाठिशी घालत आहे? असे म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर ताशेरे ओढले.
काँग्रेस आमदार संतापलेले पाहातत मंत्री नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे काँग्रेस आमदार विरुद्ध मंत्री नितेश राणे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले की, बिश्नोई गँगवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्टपणे सांगितले आहे. हे काय रोजरोज करत आहेत. कुठल्याही पद्धतीची धमकी कोणालाही आली तर ती खपवून घेणार नाही. त्यामुळे सदस्यांनी त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत, ते द्यावे त्याची दखल घेतली जाईल. तुम्ही तक्रार करा, माहिती द्या, निश्चित दखल होईल, नाही कोणीच म्हणत नाहीये, असे म्हटले.

