Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ब्रेन स्ट्रोकला नशा समजण्याची मुंबई पोलिसांकडून चूक, वृद्धाला ICU मध्ये दाखल करण्याची वेळ

ब्रेन स्ट्रोकला नशा समजण्याची मुंबई पोलिसांकडून चूक, वृद्धाला ICU मध्ये दाखल करण्याची वेळ

सुनील मेहरोत्रामुंबई : गाडी चालवताना 'ब्रेन स्ट्रोक' आल्यामुळे 73 वर्षीय वृद्धाचा अपघात झाला होता. मात्र वृद्धाने मद्यपान केल्याचा अंदाज लावून वर्सोवा पोलिसांनी सदर व्यक्तीला रुग्णालयात नेण्याऐवजी जवळपास पाच तास पोलीस ठाण्यात रोखून धरले, ज्यामुळे वृद्ध व्यक्तीवर वेळेवर उपचार होण्यास विलंब झाला.

यासंदर्भात सदर व्यक्तीचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, उपचारास सुमारे 12 तासांचा विलंब झाल्यामुळे वृद्ध व्यक्तीला अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका आला आहे. सध्या वृद्ध व्यक्तीर आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबई पोलिसांची कार्यपद्धती आणि अपघातानंतर मिळणारी वैद्यकीय मदत यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा येथे एकटे राहणारे माजी व्यावसायिक शरद कदम 25 जुलै रोजी सकाळी 9 च्या सुमारास आपली कार चालवत होते. गाडी चालवत असताना त्यांना अचानक 'ब्रेन स्ट्रोक' आला, ज्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची गाडी दुसऱ्या एका कारवर जाऊन आदळली. अपघात जरी किरकोळ स्वरूपाचा असला, तरी त्यानंतर घडलेल्या घटनेने वाद निर्माण झाला आहे. शरद कदम यांचे पुतणे रोहन राठोड यांनी सांगितले की, ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्या काकांची बोलण्याची क्षमता बाधित झाली होती आणि ते स्पष्टपणे बोलू शकत नव्हते. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी आणि दुसऱ्या कारमधून प्रवास करणारे डॉक्टर यांनी त्यांचे वय व आजाराची स्पष्ट दिसणारी लक्षणे गांभीर्याने घेतली नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र पोलिसांनी घाईघाईने ते मद्यपान केलेले असावेत, असा निष्कर्ष काढला. परिणामी, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि एफआयआर (FIR) नोंदवण्याच्या कायदेशीर प्रक्रियेत त्यांना अडकवून ठेवण्यात आले.

रोहन राठोड यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आमचे नातेवाईक जे वकील आहेत, ते वर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा त्यांना शरद कदम जमिनीवर पडलेले आणि बोलू न शकणाऱ्या अवस्थेत आढळले. असे असूनही, पोलीस ते मद्यपान केलेलेच आहेत, यावर ठाम राहिले. पोलिसांनी घटनास्थळी 'ब्रेथलायझर' चाचणीही केली नाही, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. जर पोलिसांनी त्यांना 'स्ट्रोक'चा रुग्ण म्हणून ओळखले असते आणि वेळेत रुग्णालयात नेले असते, तर आज त्यांची प्रकृती इतकी गंभीर नसती. स्ट्रोकमुळे त्यांच्या शरीराच्या उजव्या बाजूची हालचाल आता पूर्णपणे थांबली आहे.

दुसरीकडे, वर्सोवा पोलिसांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते, शरद कदम यांना रक्त तपासणीसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते. पोलिसांनी दावा केला की, तिथे त्यांनी डॉक्टरांकडे आपण मद्यपान केल्याची कबुली दिली होती. मात्र, नंतर रात्री 8 च्या सुमारास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा तिथे केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीरात मद्याचा कोणताही अंश आढळला नाही.

या प्रकरणातील एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, जरी पोलिसांना मद्यपान करून वाहन चालवल्याचा संशय असला, तरी नियमांनुसार संशयिताला त्वरित खात्री करण्यासाठी थेट रुग्णालयात रक्त तपासणीसाठी नेणे आवश्यक असते आणि कायदेशीर प्रक्रिया त्यानंतरच केली जाते. त्यामुळे, त्या वृद्ध व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणणे आणि तिथे तासनतास वाट पाहायला लावणे, या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आता या प्रकरणाला राजकीय वळणही लागले आहे. अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमित साटम यांनी पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांना पत्र लिहून वर्सोवा पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. साटम यांनी सांगितले की, स्ट्रोकची स्पष्ट लक्षणे असूनही त्या वृद्ध व्यक्तीला त्वरित रुग्णालयात का पाठवले नाही, याबद्दल त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे यांना जाब विचारला होता, परंतु त्या पोलीस अधिकाऱ्याकडे याचे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar