मुंबई : इतरांच्या चोऱ्या, घोटाळे उघडकीस आणणाऱ्या तसेच अनेक मोठ्या घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलीस दलामध्येच कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे वेतन तसेच इतर प्रशासकीय काम करणारे मंत्रालयीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला असून प्रशासनाच्या तब्बल 6.5 कोटींवर डल्ला मारला आहे.
या प्रकरणात पोलीस दलात कार्यरत नसलेल्या भलत्याच व्यक्तींना पोलीस कर्मचारी दाखवण्यात आले असून त्यांच्या नावे कोटींचा पगार लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Police
असा समोर आला घोटाळा
पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती जुन्या सेवार्थ वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये ट्रान्सफर करत असताना हा सर्व संशयास्पद प्रकार उघडकीस आला. मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागाने अंतर्गत चौकशी केली. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद नोंदी, अतिरिक्त पगाराचे वाटप, पोलीस वेतन सिस्टिममध्ये संशयासपद अपहार झाल्याचे समोर आले. याद्वारे जवळपास 6.41 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा पैसा कुठे गेला? वेतनाच्या सिस्टिममध्ये ही नोंद कोणी केली? याचा तपास अद्याप सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत असून उत्तर प्रादेशिक विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीनंतर समतानगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यादरम्यान घोटाळा झाल्याची तक्रार
तक्रार केल्यानंतर समोर आले की, हा संपूर्ण घोटाळा डिसेंबर 2019, जानेवारी आणि फेब्रुवारी 2020, जून ते सप्टेंबर 2020 दरम्यान झालेल्या वेतनात हा घोळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 2019 ते 2020 मधील वेतन खात्यात तपासात ही तफावत आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. यामधून तब्बल 6 कोटी 41 लाखांचा घोटाळा उघडकीस झाला आहे.
FIR मध्ये काय म्हटले?
समतानगर पोलीस ठाण्यात दाखल FIR नुसार, काही व्यक्तींच्या नावे पोलीस असल्याचे भासवून दरमहा पगाराची भलीमोठी रक्कम लाटली जात होती. यामध्ये रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील, पांडुरंग कदम आदींच्या नावावर वेतन जारी करण्यात आले होते. हे 10 जण नेमके कोण आहेत? तसेच त्यांच्या बँक खात्यांचा ताबा कोणाकडे होता? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
केली ही कारवाई
मुंबई पोलीस दलातील वेतन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी विजया चव्हाण, अमोल मेम्राम यांचे सेवेतून निलंबन केले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघेही निलंबित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

