Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, अमित शहांच्या पुणे दौऱ्यांवरून राऊतांचा घणाघात

देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, अमित शहांच्या पुणे दौऱ्यांवरून राऊतांचा घणाघात

वी दिल्ली : पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानिमित्त अमित शहा हे शनिवारी (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. "ज्या लोकमान्य टिळकांनी स्वाभिमानाने आणि शौर्याने ईस्ट इंडिया कंपनीशी दोन हात केले, त्यांचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे 'व्यवस्थापकीय संचालक' (MD) अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट कोणी घातला? त्यांच्या बुद्धीची कीव येते. हे नैतिक अध:पतन आहे." असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. shivsena ubt sanjay raut

"जंतरमंतरवर हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरुणांना ज्यांच्या आदेशाने ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला. त्या अमित शहांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे आणि अश्रूंचे शिंतोडे आहेत. त्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले आहे. अशा व्यक्तीच्या हस्ते टिळक पुरस्कार देणे, पुणेकर जनता मान्य करणार नाही. पुण्यात आंदोलनाची परवानगी नाकारणे ही दडपशाही आहे." असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षही उद्या पुण्यात आंदोलन करणार असून त्याचे संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. "पुणेकरांनी त्यांना विरोध करायचे ठरवले आहेत. त्या पुणेकरांचे मी अभिनंदन करतो. पुण्यात आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. यामध्ये पुन्हा एकदा साम्राज्यशाही दिसून येते." असे म्हणत टीकाही केली.

चंद्रकांत पाटलांवर टीका

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान केले होते की, "दिल्ली पोलिसांनी फार मोठा अहवाल तयार केला आहे. प्रत्येक उचललेल्या दगडावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक करून दिल्ली पोलीस तपास करत आहेत." त्यांच्या या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. "चंद्रकांतदादा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत. दगडावरचे ठसे आधारशी लिंक करायचे, हा शोध ऐकून ज्यांनी आधार कार्ड निर्माण केले. ते नंदन निलेकणी दोन दिवस कोमात गेले असतील. त्यांनाही सुचेनासे झाले असेल की काय करावे?" असे म्हणत खिल्ली उडवली. "याआधी चंद्रकांतदादांनी छातीवर दगड ठेवून विधान केले होते. आता रस्त्यावरचे दगड घेऊन बोलत आहेत. त्यांचा दगडाशी फार जवळचा संबंध आहे. पक्षात जे दगड धोंडे आले आहेत, त्याचा हा परिणाम त्यांच्यावर दिसून येत आहे. त्यांना विज्ञानाचे नोबेल दिलेच पाहिजे, नाहीतर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेल," अशी उपरोधिक टीका केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar