नवी मुंबई : नवरात्रोत्सवानिमित्त देवी आणि घटांच्या विसर्जनावेळी तलावात वाहिलेले पैसे काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या 2 चिमुरड्यांचा वाशीतील कोपरी गाव तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोलू मन्सूरी (10 वर्ष) आणि गणेश गुप्ता (12 वर्ष) अशी या मृत मुलांची नावे आहेत.
नवरात्रोत्सवानिमित्त कोपरी गाव तलावात देवीच्या मूर्ती आणि घटांचे विसर्जन करण्यात आले होते. विसर्जनावेळी तलावात वाहिलेले पैसे काढण्यासाठी गोलू आणि गणेश आपल्या मित्रांसोबत पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यावेळी त्यांनी बचावाकरिता आरडाओरडा केली. मात्र, तलाव परिरात सुरक्षा रक्षक नसल्याने त्यांना वेळेत मदत मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यादरम्यान दोन्ही बालकांचे मृतदेह हाती लागले असून, त्यांना वाशी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोपरी गावातील या तलावात लहान मुले पोहण्यासाठी उतरत असल्याचा मुद्दा यापूर्वीही उपस्थित झाला होता. तलावाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणीही स्थानिक ग्रामस्थांतर्फे वारंवार करण्यात आली होती. आता याच तलावात दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

