Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजेला विरोध करून महाराष्ट्रात सामान्यांचा आवाज बनलेले विद्यानंद बापट यांना पुण्यात टिळक रोडवर मारहाण करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवपूर्व बैठकीत विद्यानंद बापट यांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला विरोध केला होता.

विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवाला विरोध नाही तर कानठळ्या बसवणाऱ्या डीजेला विरोध असल्याचे त्यावेळीही स्पष्ट केले होते. मात्र, गणेशोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांना त्यांचे विचार न पटल्याने काही घटकांकडून त्यांना विरोध होत होता. अखेर गुरुवारी (3 सप्टेंबर) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बापट टीव्ही 9 शी संवाद साधत असताना त्यांच्यावर एकाने हल्ला करून मारहाण केली. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राज्यभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे.

असा केला हल्ला

विद्यानंद बापट टीव्ही 9 च्या प्रतिनिधीशी संवाद दाखवत होते. त्याचवेळी एक माथेफिरू अचानक बापटांकडे धावत गेला आणि तोंडावर फटका मारला. अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळ झाला. हल्लेखोराला लोकांना बाजूले केले. तरीही, असे पुणेकरांबद्दल तू काय म्हणतोस… त्याला आणखी दोन लगावू द्या… असे बोलून तुला कुणी ऑब्जेक्शन घ्यायला सांगितला, असा सवाल त्या हल्लेखोराने केला. हे सर्व कॅमेऱ्यामध्ये चित्रीत झाले आहे.

विद्यानंद बापट काय म्हणाले?

मारहाणप्रकरणी बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, तुम्ही मला प्रश्न विचारत होतात, तेव्हा एक वेडा आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो आणि पोलीस माझ्या बाजूला नव्हते, हे बघून माझ्यावर हल्ला केला. प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढावे. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. कारण त्याला सरळ सांगून कळणार नाही. खरं तर त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का? झोंबीसोबत युक्तिवाद होतो का? असे प्रश्न उपस्थित करत विद्यानंद बापट म्हणाले की, उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी उत्सव साजरे करण्याला ना विरोध केला ना आक्षेप घेतला, अशी भूमिका विद्यानंद बापट यांनी मांडली.

कडक कारवाई करणार - पोलीस आयुक्त

पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांर्भीयांने घेतले आहे. आरोपीला पकडले असून उद्या त्याला कोर्टात हजर केले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. आता पोलीस गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणावर लक्ष ठेवणार असून आवश्यक कारवाई केली जाईल. तसेच बापट यांना सुरक्षाव्यवस्था पुरवल्याचीही माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

पोलीस काय म्हणाले?

विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीबद्दल माहिती देताना डीसीपी ऋषीकेश रावळे यांनी सांगितले की, साधारण अर्ध्या तासापूर्वी विद्यानंद बापट यांना एक व्यक्तीने मारहाण केली. माध्यमांशी संवाद साधत असताना विद्यानंद बापट यांच्याबद्दल राग असलेल्या एका व्यक्तीने त्यांना मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो व्यक्ती कोण आहे? विद्यानंद बापट यांना त्याने का मारहाण केली? यासंदर्भात तपास सुरू आहे. जशी माहिती समोर येईल, ती तुम्हाला सांगितली जाईल. तसेच हल्लेखोर कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता होता का? त्याचे आणि विद्यानंद बापट यांच्यात जुने वाद होते का? यादृष्टीने देखील तपास सुरू आहे. त्यामुळे आम्ही विद्यानंद बापट यांचे स्टेटमेंट घेणार आहोत. तसेच विद्यानंद बापट यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. दरम्यान, हल्लेखोराचे नाव संतोष चव्हाण असे समोर आले असून पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar