अमरावती : अमरावती शहरात हेल्मेट सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस सतर्क असून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांना दंड आकारत आहेत. अशातच शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातील शीतल लॉज येथे राजस्थानमधील रायपूर येथून विक्रीसाठी आणण्यात आलेल्या हजारो हेल्मेट प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) आणि शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जप्त केले आहेत.
गंभीर बाब म्हणजे हे हेल्मेट एवढे तकलादू आहेत की खाली आपटताच त्याचे तुकडे होत आहेत आणि त्यातून थर्माकोल बाहेर पडत आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या हेल्मेटची गुणवत्ता आणि ते सुरक्षा मानकांनुसार आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोकडे (BIS) तपासणीसाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
दुचाकीस्वारासाठी हेल्मेट खूप महत्त्वाचे असते. एखाद्या अपघातात दुचाकीस्वार पडतो तेव्हा हेल्मेटमुळे त्याचे डोके सुरक्षित राहते. तरीही हेल्मेट न वापरण्याकडे बहुतांश चालकांचा कल असतो. आणि तरीही हेल्मेट सक्ती झाली तर पैसे वाचवण्यासाठी स्वस्तातले हेल्मेट ज्यांचे सुरक्षा मानांकन नसते, असे हेल्मेट वापरले जातात. हे हेल्मेट कसे आहेत, याचा पर्दाफाश अमरावतीमध्ये झाला आहे. या कारवाईदरम्यान पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी घटनास्थळीच हेल्मेटची प्रत्यक्ष चाचणी केली. हेल्मेट जमिनीवर आपटताच ते तुटले आणि त्यामध्ये सुरक्षा मानकांनुसार असणाऱ्या साहित्याऐवजी थर्माकोल भरलेले असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांना हेल्मेट खरेदी करण्यापूर्वी त्यावरील बीआयएस प्रमाणपत्र आणि गुणवत्ता तपासूनच हेल्मेट खरेदी करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे, जेणेकरून अपघाताच्या वेळी चालक सुरक्षित राहू शकेल.
या संयुक्त कारवाईत पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे, वाहतूक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, कोतवाली पोलीस उपनिरीक्षक शरयू उबाळे, आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक प्रमोद गोटे, कांचन जाधव तसेच इतर अधिकारी सहभागी झाले होते. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत वाहतूक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे आणि आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक प्रमोद गोटे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. त्यामुळे जीव महत्त्वाचा वाटत असेल तर दर्जाहिन आणि स्वस्तातले हेल्मेट वापरून नका, असे पोलीस सांगत आहेत.

