Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'दृश्यम ३ : द कन्क्लूजन' : रहस्याच्या गुंत्यातून थरारक प्रवास!

'दृश्यम ३ : द कन्क्लूजन' : रहस्याच्या गुंत्यातून थरारक प्रवास!

'दृश्यम ३ : द कन्क्लूजन' हा असाच एक उत्कंठावर्धक आणि थरारक अनुभव देणारा चित्रपट आहे. पहिल्या दोन भागांनी निर्माण केलेली उत्सुकता, विजय साळगावकरचे बुद्धीचे खेळ आणि त्याच्याशी जोडले गेलेले असंख्य प्रश्न पुढे नेत हा तिसरा भाग प्रेक्षकांना पुन्हा एका गुंतागुंतीच्या रहस्यविश्वात घेऊन जातो.

त्या चित्रपटावर टाकलेला हा दृष्टिक्षेप….


काही चित्रपट केवळ कथा सांगत नाहीत, तर प्रेक्षकांना त्या कथेचा एक भाग बनवतात. चित्रपट संपल्यानंतर आपण थिएटरबाहेर पडतो, मात्र काही अनुभव मनातून सहज बाहेर पडत नाहीत. मल्याळममधील 'दृश्यम ३' काही क्षणी मल्याळम आवृत्ती विसरावीशी वाटते. कारण हा सिनेमा पुरता वेगळा आहे. चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात तणाव आणि उत्कंठा इतकी प्रभावीपणे निर्माण केली आहे की पुढच्या क्षणी नेमके काय घडणार, कोणता धागा कोणत्या रहस्याशी जोडला जाणार आणि विजय साळगावकर पुन्हा एकदा या संकटातून कसा मार्ग काढणार, याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. कथेचे मूळ सूत्र पहिल्या दोन भागांशी घट्ट जोडलेले आहे. विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाभोवती घडलेल्या घटनांचे पडसाद अजूनही कायम आहेत. भूतकाळ पुन्हा वर्तमानासमोर उभा राहतो आणि जुन्या घटनांशी संबंधित अनेक प्रश्न नव्या परिस्थितीत पुन्हा समोर येतात. यावेळी विजयसमोरील आव्हान अधिक गुंतागुंतीचे आहे. तपासाची बदलती दिशा, नव्याने समोर येणारे पुरावे आणि अनपेक्षित वळणे यामुळे विजयला पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्ता, संयम आणि प्रसंगावधानाची कसोटी द्यावी लागते.

या चित्रपटातील महत्त्वाचे ट्विस्ट किंवा रहस्य आधीच उलगडणे योग्य ठरणार नाही. कारण 'दृश्यम'ची खरी ताकद केवळ कथेत काय घडते यात नसून, ते प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीने उलगडते यात आहे. त्यामुळे प्रत्येक संवाद, प्रत्येक दृश्य आणि पडद्यावर दिसणारी अगदी छोटीशी गोष्टही लक्षपूर्वक पाहावी लागते. सुरुवातीला साधा वाटणारा एखादा प्रसंग पुढे जाऊन कथेसाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो, याची जाणीव सतत होत राहते.

विजय साळगावकरच्या भूमिकेत अजय देवगण पुन्हा एकदा संयत आणि प्रभावी दिसतो. शांतपणा, परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याची क्षमता हे या व्यक्तिरेखेचे वैशिष्ट्य आहे. अजय देवगणने हे केवळ संवादांमधून नव्हे, तर डोळ्यांतील भाव, चेहर्‍यावरील सूक्ष्म हालचाली आणि देहबोलीतून प्रभावीपणे व्यक्त केले आहे. अनेक प्रसंगांत संवादांपेक्षा त्यांचे मौन अधिक काही सांगून जाते. यावेळी विशेष उल्लेख करावा लागतो तो जयदीप अहलावत यांच्या अभिनयाचा. चेहर्‍यावर बदलणारे भाव, प्रसंगानुरूप एक्स्प्रेशन्स आणि व्यक्तिरेखेतील बारकावे त्यांनी अत्यंत ताकदीने साकारले आहेत. अनेक दृश्यांत त्यांचे संवाद जितके प्रभावी आहेत, तितकेच त्यांचे हावभावही बोलके ठरतात. पडद्यावर त्यांची उपस्थिती जाणवते आणि त्यांनी आपल्या व्यक्तिरेखेला वेगळी धार दिली आहे.

तब्बू यांनी व्यक्तिरेखेतील भावनिक गुंतागुंत, ताण आणि अस्वस्थता संयमाने साकारली आहे. प्रकाश राज यांच्या संवादफेकीत आणि देहबोलीत अनुभवाची ताकद जाणवते. कमलेश सावंत, श्रेया सरन आणि इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका प्रभावीपणे साकारत कथेला भावनिक आधार दिला आहे. चित्रपटाचे संवाद हेही त्याचे महत्त्वाचे बलस्थान आहे. आमिल कियान खान यांनी लिहिलेले संवाद वरवर साधे वाटले तरी त्यामध्ये कथेशी संबंधित अनेक संदर्भ दडलेले जाणवतात. काही संवादांचा खरा अर्थ कथा पुढे सरकल्यानंतर अधिक स्पष्ट होतो आणि त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहते. तांत्रिक बाजूनेही चित्रपट भक्कम आहे. सुधीर कुमार चौधरी यांच्या सिनेमॅटोग्राफीमधून गोव्याचे निसर्गसौंदर्य आणि कथेतील रहस्यमय वातावरण यांचा सुंदर मेळ साधला आहे. प्रकाश-छाया, कॅमेरा अँगल्स आणि दृश्यरचनेचा प्रभावी वापर चित्रपटातील तणाव अधिक गडद करतो. रवि बसरूर, रोचक कोहली आणि कर्मा यांचे संगीत तसेच अमर मोहिले यांचे पार्श्वसंगीत थरार वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य क्षणी वाढणारा बॅकग्राउंड स्कोअर अनेक प्रसंग अधिक परिणामकारक बनवतो.

संदीप फ्रान्सिस यांच्या एडिटिंगमुळे चित्रपटाची गती योग्य राखली आहे. सस्पेन्सपटात एखादा प्रसंग किती वेळ टिकवायचा आणि कुठे वेग वाढवायचा, याचा समतोल साधला आहे. बायलॉन फोन्सेका यांचे साउंड डिझाइनही वातावरणनिर्मितीत महत्त्वाचे ठरते. या चित्रपटात आवाजाइतकीच शांतताही प्रभावीपणे वापरली गेली आहे. अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शक म्हणून कथा, पटकथा, अभिनय, संवाद, संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग या सर्व घटकांना एकत्र बांधत चित्रपटाचा थरार शेवटपर्यंत कायम ठेवला आहे. मूळ कथा जीतू जोसेफ यांची असल्याने 'दृश्यम'च्या मूळ विश्वाशी असलेले नातेही टिकून राहते.

एकूणच, 'दृश्यम ३ : द कन्क्लूजन' हा केवळ सस्पेन्स-थ्रिलर नाही, तर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणारा सिनेमॅटिक अनुभव आहे. अजय देवगणचा संयत अभिनय, जयदीप अहलावतचा दमदार परफॉर्मन्स, तब्बू आणि प्रकाश राज यांची प्रभावी साथ, परिणामकारक संवाद, सुंदर सिनेमॅटोग्राफी, थरार वाढवणारे संगीत आणि पार्श्वसंगीत, चपखल एडिटिंग आणि प्रभावी साउंड डिझाइन यांचे उत्तम मिश्रण चित्रपटाला वेगळी उंची देते. रहस्याच्या या गुंत्यात शिरून प्रत्येक दृश्याचा अर्थ शोधत विजय साळगावकरच्या बुद्धीच्या खेळाचा शेवटपर्यंत भागीदार होणे, हाच या चित्रपटाचा खरा आनंद आहे. सीटवरून हलू न देणारा, प्रत्येक क्षणी पुढे काय होईल याची उत्सुकता वाढवणारा आणि पडदा पडल्यानंतरही मनात रेंगाळणारा हा थरारक अनुभव नक्कीच पाहण्यासारखा आहे.

रेटिंग : (4.5/5)
परीक्षण : आशिष निनगुरकर
(लेखक चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि पटकथाकार आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar