Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एसआरएच्या विविध प्रकल्पांना गती द्या-  सौरभ राव

एसआरएच्या विविध प्रकल्पांना गती द्या- सौरभ राव

ठाणे । मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी आढावा घेतला.

यावेळी प्राधिकरणातील सुरू असलेल्या, पूर्ण झालेल्या, प्रलंबित असलेल्या तसेच प्रस्तावित प्रकल्पांची माहिती घेऊन सर्व प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस सचिव कल्पना जगताप, वित्त नियंत्रक कांचन तावडे, उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, सक्षम प्राधिकारी अश्विनी सुर्वे-पाटील, सक्षम प्राधिकारी मीनल पालांडे, कार्यकारी अभियंता सलीम सय्यद, मुख्य विधी सल्लागार ॲड. सुमन प्रसाद, सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर यांच्यासह प्राधिकरणातील इतर अधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा क्लस्टर प्रकल्प विभाग आणि एसआरए यांच्यात प्रभावी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, दोन्ही यंत्रणांमध्ये नियमित समन्वय साधण्यासाठी बैठका घेऊन प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्राधिकरणात दाखल झालेल्या नवीन प्रस्तावांची संख्या, अद्याप दाखल होणे आवश्यक असलेले प्रस्ताव, पूर्ण झालेले तसेच प्रलंबित प्रकल्प यांची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली. तसेच एसआरएच्या माध्यमातून किती क्षेत्र पुनर्विकासाच्या कक्षेत आणता येऊ शकते आणि आतापर्यंत किती क्षेत्र पुनर्विकासाच्या कक्षेत आले आहे, याचाही आढावा घेण्यात आला.
प्राधिकरणाचे काम केवळ पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासावरही भर देणारे असावे, पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधा, आवश्यक नागरी सुविधा तसेच नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रकल्पांची कार्यपद्धती अधिक परिणामकारक करण्यासाठी नवीन व चांगल्या कार्यपद्धतींचा अवलंब करावा. शासनासाठीही आदर्श ठरेल आणि सामान्य नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळेल, अशी कार्यपद्धती विकसित करण्यासाठी विहित कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच प्राधिकरणातील प्रत्येक विभागाने आपल्या कामकाजासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून त्यानुसार कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राव यांनी दिल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar