Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
घोडबंदरच्या रस्ते दुरुस्तीने वाहतूक कोलमडली; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 15 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

घोडबंदरच्या रस्ते दुरुस्तीने वाहतूक कोलमडली; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 15 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

सई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील काजूपाडा परिसरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी (4 ऑगस्ट) दुपारी भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या दिशेने वाहने चालवल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली.

परिणामी वर्सोवा पूल, ससूनवघर, मालजीपाडा, घोडबंदर रोड ते काशीमीरा परिसरापर्यंत सुमारे 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुंबईकडे तसेच गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. त्यामुळे हजारो प्रवाशांना दोन तासांहून अधिक काळ महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.

घोडबंदर येथील काजूपाडा भागात मिरा-भाईंदर महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे आधीच वाहतुकीचा वेग कमी झाला होता. त्यात काही वाहनचालकांनी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत विरुद्ध दिशेने वाहने चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणारी वाहने समोरासमोर अडकली आणि काही वेळातच वाहतूक ठप्प झाली.

या कोंडीचा सर्वाधिक फटका वसई पूर्वेकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना बसला. सुमारे 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने नोकरदार, व्यावसायिक तसेच इतर प्रवाशांना दोन तासांहून अधिक काळ महामार्गावर अडकून राहावे लागले. गुजरातकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरही वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला होता.

परिस्थितीची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, रॉंग साईडने उभ्या राहिलेल्या वाहनांमुळे वाहतूक मोकळी करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. जवळपास अर्धा ते एक तास प्रयत्न केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले की, रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीवर ताण निर्माण झाला होता. मात्र, काही वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याने कोंडी आणखी वाढली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली असून वाहनचालकांनी शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar