महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाविरोधी दिन किंवा हुंडाबंदी दिवस म्हणून पाळला जातो. गेल्या वर्षी 2025 मध्ये हुंड्यासंबंधी 138 प्रकरणे राज्यात घडली. लग्नात हुंडा मागितला जातो, तेव्हा मुलीचे आई-वडील तसेच खुद्द मुलगी इतके जुळवून आणलेले लग्न मोडू नये म्हणून गप्प राहतात.
लग्नानंतर सासर हेच तुझे घर, असे सांगून माहेरची मंडळी हात वर करतात. अशा प्रसंगी मुलीच्या कुटुंबानेच कणखर भूमिका घेतली, तर हुंड्याची जीवघेणी प्रथा बंद होऊ शकते.
हुंडाबळीचा विषय निघाला की आपल्याकडे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा होते. 16 मे 2025 रोजी तिचा मृत्यू झाला. हुंडा आणि जमिनीच्या खरेदीसाठी नवर्यासह सासरच्या मंडळींनी तिच्यावर माहेरून दोन कोटी रुपये आणण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणात तिचा पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा, दीर सुशील आणि कौटुंबिक मित्र नीलेश चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर 30 जखमा आढळल्या होत्या. यातून क्रौर्याची कल्पना येते. तरीही वैष्णवीने आत्महत्या केल्याचा सासरच्या मंडळींनी सुरुवातीला दावा केला होता. आता यातील सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कौटुंबिक मित्र नीलेश चव्हाण या तिघांना 5 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. गंभीर बाब म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी ठरली तेव्हा लग्नात 51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर गाडी दिली होती. 28 एप्रिल 2023 रोजी हगवणे कुटुंबीयांच्या आग्रहाखातर एका रिसॉर्टमध्ये त्यांचे शाही लग्न लावून दिले होते. नुसत्या जेवणावळीवर 50 लाखांचा खर्च वैष्णवीच्या कुटुंबाने केला होता. तरीही लग्नानंतर तिचा छळ करण्यात आला. पुन्हा पैशांचा, सोन्या-चांदीच्या ऐवजाचा तगादा लावण्यात आला होता. एवढे करून काय मिळाले, तर मुलीचे प्रेत, कोर्टकचेरी आणि मानसिक ताप!
आता आणखी एक प्रकरण पाहू या, अगदी दोन दिवसांपूर्वीचे! कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरातील ही घटना आहे. व्यवसाय सुरू करता यावा यासाठी नवर्यासह सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेचा अमानुष छळ करण्यात आला. त्यांचे लग्न 7 नोव्हेंबरला झाले होते आणि माहेरून 20 लाख रुपये आणण्यासाठी नवविवाहितेला अर्धी चपाती देऊन तीन दिवस उपाशी ठेवण्यात आले. हे कमी म्हणून की काय, तिचे सर्व दागिने आणि मंगळसूत्र ताब्यात घेत तिला घराबाहेर काढण्यात आले. छळाने कळस गाठल्यानंतर तिने थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी नवरा अभिषेक वासुदेवसह सासरे बाजीराव वासुदेव, सासू शर्मिला वासुदेव, नणंद सायली हजारे, तिचा पती राजू हजारे आणि दीर अभिजीत वासुदेव या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला.
तिसरी घटना सोलापूर जिल्ह्यातील आहे. सोनाली प्रतीक शिंदे हिचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पण लग्नात ठरल्याप्रमाणे हुंडा न मिळाल्यामुळे तिची 12 एप्रिल 2026 रोजी गळा दाबून हत्या करण्यात आली. हुंडा दिला नाही, तर मुलगी परत माहेरी आणून सोडेन, अशी धमकी नवर्याने दिल्यानंतर गरीब सासर्याने कसेबसे 20 हजार रुपये जमवून दिले. तरीही प्रतीक शिंदेचे समाधान झाले नाही. अखेर प्रतीक आणि त्याच्या आईने तिची हत्या केली. या तिन्ही घटना वेगवेगळ्या शहरांतील आहेत. तरीही कळीचा मुद्दा हुंडा हाच आहे. हुंडा मागणे हा हक्क असल्याचा सासरकडच्या मंडळींचा आविर्भाव असतो, तर हुंडा देणे हे जणू आपले कर्तव्य आहे, असा मुलीच्या माहेरकडील मंडळींचा समज असल्यामुळे हुंडापद्धती बंद होणे अवघड होऊन बसले आहे.
हुंडा हा लग्नसोहळ्यातील महत्त्वाचा भाग आहे, अशी आपल्याकडे आजही समजूत आहे. त्यामुळे मुलगा आणि मुलगी शिकलेले असले, तरीही लग्न ठरवताना मानपान आणि हुंड्याची चर्चा होते. कधी दागिन्यांच्या स्वरूपात, तर कधी घर घेऊन देणे किंवा व्यवसायासाठी माहेरून आर्थिक मदत घेणे, असे हुंड्याचे स्वरूप बनले आहे. पण हुंडा मागितला जातो. मुलगी नोकरी करणारी असली, तरी तीही हुंड्यासाठी तयार होते आणि तिचे आई-वडीलही हुंडा देऊन मोठे कर्तव्य पार केल्याचे दाखवत असतात. वास्तविक, राज्यात हुंडाविरोधी कायदा आहे. तरीही मुलीकडून पैसाअडका, दागदागिने, गाडी, घर, जमीन वगैरे मागितले जातात. त्यानंतरही मुलीचा छळ होतो, तिचा बळी घेतला जातो आणि त्यानंतर गुन्हे दाखल होऊन मुलीचे आई-वडील, भाऊ पोलीस ठाणे आणि नंतर कोर्टाचे उंबरठे झिजवत बसतात. याचा अर्थ हुंडाविरोधी कायद्याचा धाक नाही किंवा सर्व मॅनेज होईल, अशी समजूत ठाम झाली आहे.
शिवाय, लग्न झाल्यानंतर सासर हेच मुलीचे घर, असा मोठा (गैर)समज तिचे आई-वडील आणि नंतर भाऊ करून घेतात. त्यामुळे सासरी होणारा छळ सहन कर, मुलं झाल्यानंतर सर्व नीट होईल किंवा मागितलेली रक्कम देत राहिल्याने छळ कमी होईल, अशा संभ्रमात आई-वडील राहतात आणि एक दिवस मुलीला कायमचे गमावतात. बरं, हुंडा मागणार्यांमध्ये सासू-सासरे असतात, म्हणजे यात महिलाही आल्याच. छळ करणार्यांच्या यादीत अनेकदा नणंदही आढळते. म्हणजे दोन महिला दुसर्या घरातून आलेल्या नववधूचा छळ करतात. तेव्हा सासू हे विसरते की तीदेखील लग्न होऊन या घरात आलेली असते आणि आपली मुलगी लग्न होऊन दुसर्या घरात जाणारी असते. पण माणूस म्हणून कुणीही विचार न करता विकृत मंडळींकडून छळाची परंपरा सुरू राहते.
देशातील हुंडाबळीची आकडेवारी भयंकर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो) अहवालानुसार, भारतात 2017 ते 2021 या पाच वर्षांच्या कालावधीत हुंडाबळीच्या एकूण 35 हजार 493 घटनांची नोंद झाली आहे. म्हणजेच रोज सरासरी 20 महिलांचा बळी हुंड्यासाठी गेला. 2024 मधील आकडेवारीनुसार, देशात 5 हजार 737 हुंडाबळी झाल्या आहेत. याचा अर्थ रोज सरासरी 16 महिलांना हुंड्यासाठी केला जाणारा छळ सहन करताना जीव गमवावा लागला आहे. ही केवढी गंभीर बाब आहे! यातील सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडतात आणि महाराष्ट्राचा क्रमांक सहावा आहे. यासाठी अनेक कारणे दिली जात असली, तरी पितृसत्ताक पद्धत आणि महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक ही यामागील मुख्य कारणे आहेत. महाराष्ट्रात 2006 पासून हुंडाविरोधात सरकारी पातळीवर जनजागृती केली जात आहे. शिवाय, अनेक स्वयंसेवी संस्था आणि महिला संघटना हुंडाविरोधात कार्य करत आहेत. शिक्षणाचा प्रसार वाढल्यामुळेही हुंडापद्धत बंद होईल, असे वाटत होते. लोकजागृतीमुळे प्रमाण कमी झाले असले, तरी आता उच्चशिक्षित मंडळीही हुंडा मागत आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च ते वसूल करत आहेत. यातून लोक शिकले असले, तरी सुशिक्षित झाले नाहीत, हे जाणवते.
हुंडा मागणे म्हणजे नवर्या मुलाने स्वत:ला विकल्यासारखे आहे. आपण कर्तृत्ववान नाही, लाचार आहोत, ही हुंडा घेण्यामागची मानसिकता आहे. आपण स्वबळावर काहीही करू शकत नाही, म्हणून इतरांच्या मदतीच्या कुबड्यांवर जगण्याची वेळ आली आहे, हा हुंड्याचा अर्थ आहे. सर्वांना वाटते की आपला गुन्हा उघड होणार नाही. वास्तव वेगळे आहे. बहुतांश प्रकरणांत सासरकडची मंडळी तुरुंगात जातात, त्यांची समाजात नाचक्की होते. कधीतरी जामिनावर सुटून येतात. म्हणजे सुख मिळतच नाही. ज्याच्यासाठी चुकीचा अट्टाहास केला जातो, ते साध्य होत नाही. त्याऐवजी हुंडा न घेता मुलाचे लग्न लावा. सासर-माहेरची मंडळी आनंदी राहतील, असे पाहा. तसे केल्यास कुणालाच त्रास होणार नाही, मानापमानाचा प्रश्नच राहणार नाही आणि कोणत्याही मुलीचा बळी जाणार नाही. मात्र, यासाठी माणूस म्हणून जाणीव असणे आणि कायद्याचा धाक असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या देशात देवीची पूजा केली जाते, आराधना केली जाते, त्या देशात हुंडाबळी जात असतील, तर महिलांच्या अस्तित्वालाच आपण बेदखल करतो, असे म्हणावे लागेल.

