Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जव्हारच्या आश्रमशाळांमध्ये विज्ञान शिक्षक देण्याचे निर्देश

जव्हारच्या आश्रमशाळांमध्ये विज्ञान शिक्षक देण्याचे निर्देश

व्हार : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वृत्त 'आपलं महानगर ने १३ ऑगस्ट, शुक्रवारी प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने दखल घेत संबंधित शासकीय आश्रमशाळांमध्ये विज्ञान विषयाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती दिली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जव्हारचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदेश शेरेकर यांनी यासंदर्भात सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांना पत्र दिले आहे. अनेक शासकीय आश्रमशाळांमध्ये शाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही विज्ञान विषयाचे शिक्षक उपलब्ध झाले नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, १० ऑगस्टपर्यंत शिक्षक उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांना जव्हार प्रकल्प कार्यालयात आणून शाळा भरविण्याचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, याबाबत शासन स्तरावर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून, पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नियमित शिक्षक उपलब्ध होतील, असे प्रकल्प कार्यालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ६ ऑगस्टपासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विज्ञान विषयाचे शिक्षक तातडीने उपलब्ध करून विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन सुरू करण्याच्या या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 'आपलं महानगर'च्या वृत्तामुळे प्रशासनाने दखल घेतल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar