सकाळी उठल्यावर अनेकदा उशी ओली झालेली दिसते किंवा झोपेत तोंडातून लाळ गळल्याचं जाणवतं, ही गोष्ट अगदी सामान्य वाटत असली तरी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. झोपेत तोंडातून लाळ गळणे ही केवळ झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे होणारी गोष्ट नसून त्यामागे शरीरातील काही आरोग्यविषयक कारणेही असू शकतात.
रात्री झोपेत लाळ का गळते आणि या समस्येवर काय उपाय करता येतील? जाणून घेऊयात. saliva leaking from mouth while sleeping
झोपण्याची पद्धत
पाठीवर झोपण्याऐवजी एका कुशीवर किंवा पोटावर पालथे झोपल्यामुळे तोंडात तयार झालेली लाळ बाहेर गळते.
ॲलर्जी
सर्दी, सायनस किंवा ॲलर्जीमुळे नाक बंद झाल्यास व्यक्ती तोंडाने श्वास घेते. ज्यामुळे तोंड उघडे राहिल्याने लाळ बाहेर पडते.
एसिड रिफ्लक्स
ॲसिडिटी किंवा गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्सची समस्या असल्यास पोटातील ॲसिड अन्ननलिकेत वर येते, ज्यामुळे लाळग्रंथी अधिक लाळ तयार करतात.
स्लीप ॲप्निया
हा झोपेशी संबंधित एक गंभीर विकार आहे, ज्यामध्ये झोपेत श्वास अडकतो. यामुळे व्यक्ती तोंडाने श्वास घेते आणि लाळ गळते.
औषधांचे दुष्परिणाम
नैराश्य किंवा मज्जासंस्थेशी संबंधित आजारांवरील काही औषधोपचारांमुळे तोंडात जास्त लाळ तयार होते.
उपाय काय?
- नेहमी पाठीवर सरळ झोपण्याचा प्रयत्न करा.
- सर्दी किंवा सायनसचा त्रास असल्यास वाफ घ्या.
- रात्रीचे जेवण हलके ठेवा.
- झोपण्याच्या 2 तास आधी जेवा, जेणेकरून ॲसिडिटी होणार नाही.
- दिवसभरात भरपूर पाणी प्या.
- जर ही समस्या दररोज उद्भवत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

