वसई : वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली हरित पट्टी आणि बदलते हवामान याच्या पार्श्वभूमीवर विरारच्या जीवदानी मंदिर परिसरात पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून झालेल्या या वृक्षारोपण मोहिमेत केवळ झाडे लावण्यावरच नव्हे तर ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यावरही विशेष भर देण्यात आला.
विरारमधील प्रसिद्ध जीवदानी मंदिर परिसर पुन्हा एकदा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचा साक्षीदार ठरला. दरवर्षीप्रमाणे यंदाही जीवदानी देवस्थान ट्रस्टच्या पुढाकारातून मंदिराच्या पायथ्याशी भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात वसई-विरार शहर महापालिका, वन विभाग, पोलीस विभाग, विविध शाळांचे विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने मंदिर परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. परिसरातील मोकळ्या जागांमध्ये विविध प्रकारची स्थानिक आणि पर्यावरणपूरक झाडे लावण्यात आली. या उपक्रमामुळे भविष्यात जीवदानी परिसरातील हरित पट्टा अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे.
यंदाच्या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी झाडांचे संगोपन आणि संवर्धन यावर अधिक भर देण्यात आला. नव्याने लावलेल्या रोपांना नियमित पाणी मिळावे आणि ती चांगली वाढावीत यासाठी काही ठिकाणी ठिबक सिंचन तसेच स्प्रिंकलर यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे लावलेल्या प्रत्येक झाडाच्या संरक्षणाची जबाबदारीही नियोजनबद्ध पद्धतीने घेतली जात आहे.
देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दरवर्षी वन विभाग, महानगरपालिका, पोलीस विभाग, विविध शाळा आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम सातत्याने राबवला जातो. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड जितकी महत्त्वाची आहे, तितकेच त्या झाडांचे संगोपनही आवश्यक असल्याने त्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान एक तरी झाड लावून त्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सामूहिक सहभागातूनच पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक प्रभावी होऊ शकते, असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला.

