मुंबई : लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये लोकलमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच सुरक्षित प्रवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
क्षुल्लक कारणावरून मागील काही महिन्यात मुंबई लोकलमध्ये दोन हत्या झाल्या आहेत. तर काही अशा सुद्धा घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये प्रवासी एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत टोकाला पोहोचलेले पाहायला मिळाले आहे. मात्र आता पुन्हा एकदा लोकल ट्रेनवर दगडफेक झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील महिन्यात हार्बर रेल्वे मार्गावरील जुईनगर स्थानकाजवळ धावत्या लोकलवर एका अनोळखी व्यक्तीने दगडफेक केली होती. या दगडफेकीत लोकलचे गार्ड सुनील कुमार हे गंभीर जखमी झाले होते. यानंतर आता ट्रान्स हार्बरवरील दिघा परिसरात एक तरुण धावत्या लोकल ट्रेनवर दगडफेक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढेच नव्हे तर दगड फेकल्यानंतर तरुण रेल्वेतील प्रवाशांना उद्देशून हातवारे अश्कील हावभाव करताना दिसत आहे. सदर तरुणाने लोकल ट्रेनवर दगडफेक करतानाचा संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड करून आपल्या सोळल मीडियावर रीलच्या माध्यमातून व्हायरल केला आहे. संबंधित तरुणाची अधिकृत ओळख आणि व्हिडीओबाबत रेल्वे पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र दगडफेक करणाऱ्या तरुणाचे नाव अजय शिंदे असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, धावत्या लोकल ट्रेनवर दगडफेक केल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. संबंधित तरुणाने फेकलेला दगड धावत्या लोकलच्या फुटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशांना लागण्याची शक्यता अधिक आहे. तसेच फेकलेला दगड खिडकीतून आत जाऊन प्रवासी जखमी होण्याची देखील शक्यता आहे. महत्ताचे म्हणजे लोकल ट्रेनच्या चालकाला किंवा ट्रेनच्या महत्त्वाच्या भागाला दगड लागल्यास मोठा अपघात होण्याचा धोकाही अधिक आहे. त्यामुळे संबंधित व्हिडीओची पडताळणी करून दोषी तरुणावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.

