Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कलेची प्रतिष्ठा मोठी असावी

कलेची प्रतिष्ठा मोठी असावी

-अ‍ॅड. ईश्वरी जाधव

पौराणिक काळापासून भारतीय संस्कृतीच्या अनेक पदरांची साक्षीदार असलेल्या, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि गोदावरीच्या पावन तीरावर वसलेल्या नाशिकनगरीत बहरलेलं एक हरहुन्नरी, उत्साही आणि ढोल-ताशाच्या कलेने अक्षरश: झपाटलेले व्यक्तिमत्त्व 'प्रितम भामरे'.

नुकताच त्यांनी स्वत:च्या अनुभवातून साकारलेले 'ढोल ताशा विश्वाची दुनिया' हे पुस्तक वाचण्याचा योग आला. पथकाची ओळख निर्माण व्हावी; पण कलेची प्रतिष्ठा त्याहून मोठी असावी. ही मर्यादा पाळली तर व्यावसायिकता ही कलेची शत्रू न राहता तिच्या विस्ताराचे साधन बनू शकते. यासाठीच अशा पुस्तकांची गरज आहे.


एखाद्या कलेच्या प्रेमात पडणे ही एक गोष्ट; पण त्या कलेचा व्यासंग जोपासणे, तिच्या वाटेवर येणार्‍या अडचणींना सामोरे जाणे, स्वत:ला त्या प्रक्रियेत घडवत जाणे आणि शेवटी आपल्या अनुभवांचा दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न करणे ही त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. प्रितम यांच्या प्रवासाकडे पाहताना हीच बाब विशेषत्वाने जाणवते. ढोल-ताशाच्या धुंदीत तावून-सुलाखून निघालेले अनेक 'प्रितम' महाराष्ट्रात असतील. फरक एवढाच की, अनेकांनी ही कला जगली असेल; पण प्रितम यांनी ती जगतानाचा अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच या पुस्तकाचे महत्त्व केवळ त्यातील माहितीमध्ये नाही, तर त्या माहितीमागे असलेल्या अनुभवाच्या प्रामाणिकपणात आहे. खरे तर ढोल-ताशाकडे केवळ एक वाद्यकला म्हणून पाहणेच तिच्या व्यापकतेला मर्यादा घालणारे ठरेल. मानवी संस्कृतीच्या इतिहासात तालाला विलक्षण महत्त्व आहे. आदिम समाजांच्या सामूहिक विधींमधील ढोल असो, युद्धाच्या रणशिंगासोबत उमटणारा रणताल असो, धार्मिक विधी असोत किंवा लोकउत्सव, तालाने माणसाला एकत्र आणण्याचे काम हजारो वर्षांपासून केले आहे.

जपानचे Taiko, आफ्रिकेतील सामूहिक ड्रमिंग, स्कॉटलंडच्या मार्चिंग पाइप-बँड्स किंवा ब्राझीलच्या Samba परंपरेतील तालवाद्ये पाहिली, तर एक समान सूत्र जाणवते, वाद्य वेगवेगळी असली तरी त्यामागची मानवी भावना एकच आहे: व्यक्तीला समूहाशी जोडणे आणि समूहाला एका सामूहिक ऊर्जेत रूपांतरित करणे. महाराष्ट्रातील ढोल-ताशा परंपरेकडेही याच व्यापक संदर्भातून पाहण्याची गरज आहे. विशेषत: सार्वजनिक गणेशोत्सवाने या कलेला गेल्या काही दशकांत एक नवे सार्वजनिक व्यासपीठ दिले. पुण्याने तर ढोल-ताशाला एक स्वतंत्र सांस्कृतिक प्रतिष्ठा, ओळख आणि ग्लॅमर मिळवून दिले. मात्र, माझ्या प्रामाणिक निरीक्षणानुसार, पुण्याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या इतर भागांत या कलेला अजूनही तितका व्यापक सामाजिक स्वीकार आणि प्रतिष्ठा मिळणे बाकी आहे.

ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे; मात्र त्यासाठी ढोल-ताशाकडे पाहण्याची आपली दृष्टीच थोडी बदलावी लागेल. कारण ढोल-ताशा म्हणजे केवळ गणेशोत्सवातील काही तासांचा जल्लोष नाही. त्या काही तासांमागे कित्येक आठवड्यांची, महिन्यांची साधना असते. शारीरिक कष्ट असतात, तालाची शिस्त असते, वेळेचे बंधन असते, आर्थिक नियोजन असते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वत:पेक्षा पथकाला प्राधान्य देण्याची मानसिकता असते. याच ठिकाणी या कलेचे एक फार सुंदर तत्त्वज्ञान दडलेले आहे 'मी'पासून 'आपण'पर्यंतचा प्रवास. ढोल हातात घेतल्यावर प्रत्येक वादकाचा हात स्वतंत्र असतो; पण त्याचा ठेका स्वतंत्र राहत नाही. शेजारच्या वादकाचा ठेका, पुढच्या रांगेची लय आणि संपूर्ण पथकाची गती यांच्याशी स्वत:ला जुळवून घेतल्याशिवाय सामूहिक नाद निर्माण होत नाही. इथे स्वत:चा आवाज मोठा करण्यापेक्षा पथकाचा नाद मोठा करण्याची कला शिकावी लागते. ढोल-ताशा ही केवळ वाद्यकला नाही; ती एक सामूहिक शिस्त आहे. ती अहंकाराला नाकारत नाही, पण त्याला समूहाच्या हितासाठी संयमित करायला शिकवते. 'माझा ठेका' महत्त्वाचा असतोच; पण त्याहून महत्त्वाचा असतो 'आपला ताल' आणि म्हणूनच ढोल-ताशाचा अनुभव प्रत्यक्षात 'अहं'पासून 'वयं'पर्यंतचा प्रवास घडवणारा आहे.

हीच गोष्ट या कलेला आजच्या काळात अधिक महत्त्वाची बनवते. कारण आपण एका अशा काळातून जात आहोत, जिथे व्यक्तिकेंद्रीपणा वाढतो आहे आणि प्रत्यक्ष सामाजिक सहभाग कमी होत आहे. सोशल मीडिया आपल्याला जोडतो, पण त्याच वेळी माणसांमधील प्रत्यक्ष संवाद कमीही करतो. अशा वेळी शेकडो व्यक्तींनी एकत्र येऊन, एकाच तालात, एकाच शिस्तीत आणि एकाच भावनेने काहीतरी निर्माण करणे ही स्वत:मध्येच मोठी सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणूनच समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी ढोल-ताशाच्या या अनुभवातून जावे, असे मनापासून वाटते. त्या काही तासांत माणूस स्वत:च्या चौकटीबाहेर येतो. वय, व्यवसाय, आर्थिक स्तर, सामाजिक स्थान किंवा पूर्वानुभव यांचे महत्त्व कमी होते आणि हातातील वाद्य व समोरचा ताल एवढेच उरते. तेव्हा व्यक्ती राहात नाही; पथक राहते. 'मी' राहात नाही; 'आपण' उरते. मात्र या कलेला ही उंची द्यायची असेल, तर केवळ भावनिक आवेश पुरेसा नाही. तिच्यामागील संपूर्ण व्यवस्था अधिक सक्षम करावी लागेल.

एक चांगले ढोल-ताशा पथक ही प्रत्यक्षात एक छोटेखानी व्यवस्थापनशाळाच असते. त्यामागे शिस्तबद्ध संघटन, आर्थिक नियोजन, सातत्यपूर्ण सराव, वाद्यांची देखभाल, प्रशिक्षक व वादक यांच्यातील समन्वय, वेशभूषा, वाहतूक, खान-पान, कार्यक्रमाचे नियोजन, वेळेचे भान आणि प्रशासनाशी समन्वय अशा अनेक गोष्टी असतात. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असते ती एक भावना, हे केवळ माझे पथक नाही; ही माझी जबाबदारी आहे. पथकाचा भार माझ्या खांद्यावर आहे, या भावनेतून जेव्हा प्रत्येक सदस्य आपापली भूमिका पार पाडतो, तेव्हाच सामूहिक गुणवत्ता निर्माण होते. त्यामुळे ढोल-ताशा पथकांकडे केवळ कलाकारांचा समूह म्हणून नव्हे, तर स्वयंशिस्त, स्वयंसेवा आणि सामूहिक नेतृत्वाची उदाहरणे निर्माण करणारी एक सांस्कृतिक संस्था म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. याचबरोबर काही बाबतीत आत्मपरीक्षणही आवश्यक आहे. उत्सव मोठे होत असताना त्यांची व्यावसायिकता वाढत आहे. सोशल मीडिया प्रसिद्धी, प्रायोजकत्व, आकर्षक वेशभूषा आणि भव्य सादरीकरण यांना निश्चितच महत्त्व आहे; पण त्याच वेळी कलेचा गाभा केवळ देखाव्यात हरवू नये. ध्वनिप्रदूषण, सार्वजनिक सुव्यवस्था, वाहतूक, प्रशासनाच्या नियमांचे पालन, वेळेच्या मर्यादा, हुल्लडबाजांचा त्रास आणि नागरिकांच्या सोयी यांचा विचार करून उत्सव साजरा करणे हीदेखील त्या कलेबद्दलचीच जबाबदारी आहे.

उत्सव मोठा व्हावा; पण संस्कृतीला गालबोट लागता कामा नये. नाद दुमदुमावा; पण शिस्त त्याहून मोठी असावी. पथकाची ओळख निर्माण व्हावी; पण कलेची प्रतिष्ठा त्याहून मोठी असावी. ही मर्यादा पाळली तर व्यावसायिकता ही कलेची शत्रू न राहता तिच्या विस्ताराचे साधन बनू शकते. यासाठीच अशा पुस्तकांची गरज आहे. 'ढोल ताशा विश्वाची दुनिया' या पुस्तकाचे मला सर्वांत महत्त्वाचे योगदान वाटते ते म्हणजे या कलेला शब्द मिळवून देण्याचा प्रयत्न. एखादी कला वाजवली जाते तेव्हा तिचा नाद ऐकू येतो; पण ती लिहिली जाते तेव्हा तिच्यामागची माणसे, त्यांचे कष्ट, संघर्ष, विचार आणि प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण होते.

आज महाराष्ट्रात विविध ढोल-ताशा पथके वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या इतिहासाचे, वादनशैलीचे, प्रशिक्षणपद्धतीचे, संघटनरचनेचे, आर्थिक नियोजनाचे, वाद्यनिर्मितीचे आणि सामाजिक योगदानाचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण होणे ही काळाची गरज आहे. कदाचित पुढच्या टप्प्यावर या कलेचा विचार 'उत्सवातील वादन' या मर्यादित चौकटीबाहेर नेण्याची वेळ आली आहे. शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, युवक संघटना आणि सामाजिक संस्थांमध्ये ढोल-ताशाच्या माध्यमातून शिस्त, नेतृत्व, टीमवर्क आणि सामूहिक सहभागाचे संस्कार रुजवता येऊ शकतात. म्हणजेच ही कला केवळ सणापुरती मर्यादित न राहता एक सामाजिक-सांस्कृतिक चळवळ बनू शकते. आणि इथेच 'ढोल ताशा विश्वाची दुनिया' या पुस्तकाची सुरुवात एका मोठ्या प्रवासाची नांदी ठरू शकते, असे मनोमन वाटते. कारण एखाद्या परंपरेचे संवर्धन केवळ ती जशी आहे तशी जपण्यात नसते; तिच्या मुळांचा आदर राखून तिला काळाच्या गरजेनुसार नवी दिशा देण्यात असते. आज ढोल-ताशाचा नाद आपल्याला आनंद देतो. उद्या तो एखाद्या नव्या पिढीला संघटन, शिस्त, समता, नेतृत्व आणि 'मी'पेक्षा 'आपण' मोठे असल्याची जाणीव देऊ शकतो. कदाचित या कलेची खरी ताकद तिथेच आहे.

एक हात ठेका देतो. अनेक हात ताल निर्माण करतात.पण अनेक मने एकत्र आली, तर तीच ऊर्जा संस्कृती घडवते. या अर्थाने 'ढोल ताशा विश्वाची दुनिया' हे केवळ पुस्तकाचे शीर्षक नाही; ती एका मोठ्या सांस्कृतिक विश्वाची ओळख आहे, जिथे नाद आहे, ऊर्जा आहे, शिस्त आहे, वेड आहे आणि त्याहीपलीकडे आहे 'आपण' असण्याची अनुभूती. या विश्वाचा अनुभव घेण्याची, त्याचा अभ्यास करण्याची आणि त्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत अधिक सन्मानाने पोहोचवण्याची गरज आज पूर्वीपेक्षा अधिक आहे. त्यांची ही धडपड केवळ एका पुस्तकापुरती मर्यादित न राहता, या कलेविषयी अधिक अभ्यास, अधिक संवाद आणि अधिक व्यापक सामाजिक स्वीकार निर्माण करण्यास कारणीभूत ठरो, हीच अपेक्षा. महाराष्ट्राच्या मातीतून उमटणारा हा नाद केवळ उत्सवातच कानावर पडत राहू नये; तर तो अखंड हिंदुस्थानातील तनातनांत आणि मनामनांत रुजत राहावा.

(लेखिका मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar