Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कांदिवलीतील माथाडींच्या जमिनीवरील शर्तभंगाची होणार चौकशी, मंत्री बावनकुळेंची घोषणा

कांदिवलीतील माथाडींच्या जमिनीवरील शर्तभंगाची होणार चौकशी, मंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील माथाडी कामगारांसाठी असलेल्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंड हस्तांतरण तसेच पुनर्विकास प्रक्रियेत झालेला शर्तभंग सरकारने मान्य केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26 हजार 900 चौरस मीटर अतिरिक्त शासकीय जागा संस्थेकडून पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (2 जुलै) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. शिवसेना ठाकरे गटाच्या हारून खान यांनी कांदिवलीतील भूखंड हस्तांतरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे यांनी ही घोषणा केली.

याबाबत मंत्री बावनकुळे यांनी म्हटले की, कांदिवली येथील सर्वे नंबर 149 मधील 27 एकर जागा कापड बाजार आणि दुकान मंडळाला देण्यात आली होती. त्यानंतर ती 'विशाल सह्याद्री सहकारी गृहनिर्माण संस्थे'ला हस्तांतरित झाली. या प्रक्रियेत 11,254 चौ. मीटर जागा विशाल संस्थेला, 334 चौ. मीटर गणेश मंदिराला, 2000 चौ. मीटर रयत शिक्षण संस्थेला, तर उर्वरित 99,116 चौ. मीटर जमीन विशाल सह्याद्री संस्थेला भाडेपट्ट्याने देण्यात आली. यातील वर्ग-2 च्या जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करताना शासनाने 42 कोटी 7 लाख 3 हजार रुपयांचे शुल्क वसूल केले होते. तसेच 74 कोटी 9 लाख 90 हजारांचे मुद्रांक शुल्कही आकारण्यात आले होते. या हस्तांतरण प्रक्रियेत बांधकामाची मुदतवाढ, वाणिज्यिक वापर आणि तद्नंतरचे हस्तांतरण यामध्ये शर्तभंग झाला आहे. हा शर्तभंग नियमित करण्यासाठी आधीच 21.67 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मात्र, तरीही लीज डॉक्युमेंट आणि हस्तांतरण प्रक्रियेत काही कायदेशीर त्रुटी राहून गेल्याचे समोर आले आहे, अशी माहिती बावनकुळेंनी दिली.

या प्रकरणातील मुद्रांक शुल्क संदर्भातील त्रुटींची आणि अनियमिततेची चौकशी पुढील 15 दिवसांत नोंदणी महानिरीक्षक, पुणे यांच्यामार्फत केली जाईल. खालच्या स्तरावर काही गडबड झाली आहे का, याचा संपूर्ण डेटा 7 ते 15 दिवसांत सरकारकडे येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच, विकासकासोबत करारनामा करताना जिल्हाधिकार्‍यांची परवानगी न घेता 26,900 चौ. मीटर क्षेत्राचा समावेश करण्यात आल्याने, हा मोठा शर्तभंग ठरवून ती जागा शासकीय ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात येतील, असेही यावेळी मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तर, ज्या जमिनीवर आधीच घरे बांधून गृहनिर्माण सोसायट्या तयार झाल्या आहेत, तेथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि कामगारांना पूर्ण संरक्षण दिले जाईल. सरकार त्यांच्या जमिनी 'फ्री होल्ड' करून त्यांच्या मालकी हक्काच्या करणार आहे, अशी माहिती सुद्धा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar