Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कर्मचाऱ्याच्या पाठिंब्यासाठी मुंबई पोलीस मैदानात, विरोधकांच्या आरोपांवर दिले स्पष्टीकरण

कर्मचाऱ्याच्या पाठिंब्यासाठी मुंबई पोलीस मैदानात, विरोधकांच्या आरोपांवर दिले स्पष्टीकरण

मुंबई : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. मुंबईत तर या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली असली तरी विद्यार्थी आंदोलक मात्र या जमावबंदीला सुद्धा जुमानत नसल्याचेच पाहायला मिळत आहे.

त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी (23 जुलै) दादर शिवसेना भवन परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना यावेळी शिवाजी पार्क पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवले. मात्र, या कारवाईच्या वेळेसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यामध्ये एक साध्या वेशातील पोलीस एका तरुणीला चुकीच्या पद्धतीने पकडताना दिसत आहे. त्यामुळे या पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ आता विरोधकांनी सुद्धा शेअर करून त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, आता या कर्मचाऱ्याच्या पाठिंब्यासाठी मुंबई पोलीस मैदानात उतरले असून त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काँग्रेस खासदार तथा मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांच्या कारवाईचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला रिपोस्ट करत या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई पोलिसांनी सर्वप्रथम आमदार रोहित पवारांच्या व्हिडीओला रिपोस्ट केले असून या घटनेसंदर्भातील स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, "महोदय, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली. एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे." असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

यानंतर मुंबई पोलिसांकडून खासदार वर्षा गायकवाड यांच्याही व्हिडीओ रिपोस्ट करण्यात आले असून त्यांनी त्यांनाही सल्ला देत म्हटले आहे की, "मॅडम, कृपया लक्षात घ्या की, या घटनेचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. तेथील कायदा व सुव्यवस्था राखत असताना, एक अधिकारी एका पुरुष निदर्शकाला पकडण्याचा प्रयत्न करत होते; त्याचवेळी, त्यांचे लक्ष दुसरीकडे असताना एक महिला नकळतपणे त्यांच्यामधे आली. एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून, केवळ एका व्हिडिओच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आपण वस्तुस्थितीची खात्री करणे अपेक्षित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची पडताळणी केली आहे आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्या व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण केले आहे."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar