धर्मा प्रॉडक्शन्स आणि डोपामाइन स्टुडिओज यांनी आपल्या आगामी 'कालिया' या महत्त्वाकांक्षी मॉन्स्टर थ्रिलर चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेता कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 5 मे 2028 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
'कालिया' हा धर्मा प्रॉडक्शन्सचा चित्रपट असून त्याची निर्मिती करण जोहर, अदर पूनावाला, अपूर्व मेहता, सोमन मिश्रा, मारिज्के डिसूझा आणि कार्तिक आर्यन यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप मोदी करणार आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत तुलनेने फारसा हाताळला न गेलेला मॉन्स्टर थ्रिलर हा प्रकार 'कालिया'च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न धर्मा प्रॉडक्शन्सने केला आहे. भारतीय चित्रपटांच्या कथाविश्वाला नवे आयाम देण्याच्या आणि पारंपरिक कथनशैलीच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे सादर करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
भारतीय ग्रामीण संस्कृती, पौराणिक संदर्भ आणि समृद्ध लोककथांच्या विश्वावर आधारित असलेला 'कालिया' हा चित्रपट एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवणार आहे. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या भारतीय सांस्कृतिक कथा, श्रद्धा आणि समजुती यांचा आधार घेत या चित्रपटात मॉन्स्टर थ्रिलर या जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या चित्रप्रकाराला अस्सल भारतीय ओळख देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना रहस्य, थरार आणि भारतीय लोकपरंपरेचा अनोखा अनुभव मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे.
दिग्दर्शक संदीप मोदी यांच्यासाठीही 'कालिया' हा विशेष महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. 'द नाईट मॅनेजर' आणि 'आर्या' यांसारख्या गाजलेल्या वेब सीरिजच्या दिग्दर्शनानंतर 'कालिया'च्या माध्यमातून ते पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाचे थिएटरमध्ये दिग्दर्शन करणार आहेत. तर कार्तिक आर्यनदेखील या चित्रपटातून पहिल्यांदाच मॉन्स्टर थ्रिलर या वेगळ्या जॉनरमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नवे कथाविश्व, भारतीय लोककथांचा अनोखा आधार आणि कार्तिक आर्यनची वेगळी भूमिका यामुळे 'कालिया' या चित्रपटाबद्दल आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.'कालिया' 5 मे 2028 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

