- सई लळीत
कपडे अत्यंत साधे. सगळ्या प्रेक्षकांमध्ये सुध्दा एवढे साधे कपडे कुणाचेच नव्हते.. आवाजाची पट्टी अगदी खालची आणि अविर्भाव तर नाहीच नाही. बरं खासदार असून साधी एक शिवी पण अर्ध्या पाऊण तासात हासडली नाही.
बोलण्याची टॅक्ट नाही. चमक नाही. चतुरपणा नाही. मुलाखत घेणारे, प्रेक्षक सगळेच हतबुद्ध झाले. प्रांजळपणा एवढा हैराण करतो? उत्तरं सगळी अचूक. पण एकदम साधी, तिखट नाही. मीठ नाही. चमचमीत हा शब्द पण त्यांना माहीत नसेल. ते निष्ठावंत होते.
अजूनही कळत नाही ती अपूर्व चतुराई होती की साधेपणाचा कहर होता? वेगवेगळ्या खोचक प्रश्नांना अत्यंत साधेपणाने उत्तर देऊन चितपट केलं जात होतं. (की प्रश्न आपणच चितपट होत होते?)? चमकदार उत्तर यायलाच पाहिजेत किंवा गुपित फुटायलाच पाहिजे अशा उत्सुक प्रश्नांना अत्यंत साधेपणाने उत्तर दिली जात होती.
दोन पाच दिवसांपूर्वी एका खासदाराची मुलाखत टीव्हीवर बघितली. (कोण कोण खाजदार बोलतात.) खासदार खासदार वाटतच नव्हते. हे त्यांनी पण मान्य केले. त्यांना म्हणे बर्याच लोकांनी हे सांगितलंय. हे दूषण त्यांनी भूषण मानलंय.
कपडे अत्यंत साधे. सगळ्या प्रेक्षकांमध्ये सुध्दा एवढे साधे कपडे कुणाचेच नव्हते.. आवाजाची पट्टी अगदी खालची आणि अविर्भाव तर नाहीच नाही. बरं खासदार असून साधी एक शिवी पण अर्ध्या पाऊण तासात हासडली नाही. बोलण्याची टॅक्ट नाही. चमक नाही. चतुरपणा नाही. मुलाखत घेणारे, प्रेक्षक सगळेच हतबुद्ध झाले. प्रांजळपणा एवढा हैराण करतो? उत्तरं सगळी अचूक. पण एकदम साधी, तिखट नाही. मीठ नाही. चमचमीत हा शब्द पण त्यांना माहीत नसेल. ते निष्ठावंत होते. (निष्ठावंत एवढे बोअर असतात?) लोकांना हल्ली प्रत्येक गोष्टीत मनोरंजनाची हमी हवी असते.
प्रश्न- जे सहा खासदार फुटले ते तुमच्या संपर्कात होते का?
उत्तर- नाही. मी लोकसभेत एका बाजूला बसायचो. ते दुसर्या अंगाला बसत होते. त्यामुळे काही संपर्क आला नाही. दुसरं म्हणजे कामकाज संपल्यावर मी सरळ रूमवर जायचो. संध्याकाळी इथे तिथे फिरायला जायचो नाही.
प्रश्न- ते कुठे फिरायला जायचे?
उत्तर- ते भेसळ सॉरी भेळ खायला जात असतील. मला कल्पना नाही. पाणीपुरी बी पीत असतील.
प्रश्न- मोबाईल नावाची वस्तू तुम्हाला माहीत आहे का? त्यात कितीही लांब एक्या अंगाला बसलेला माणूस असला तरी बोलता येतं.
उत्तर- (हसत) मला मोबाईलवर बोलता येतं हे त्यांना माहीत नसेल.
प्रश्न- ते स्वताला स्मार्ट समजत असतील ?
उत्तर- होय. म्हणजे ते आहेतच. ते खूप स्मार्ट आहेत.
प्रश्न- ते तुमच्याशी काहीच बोलले नाहीत?
उत्तर- तसं बोलले. आभाळ आलंय असं एकजण म्हणाला. मी गेलो की ते शाळेच्या गोष्टी सुरू करायचे. गुरुजींनी वर्गाबाहेर काढलं. उठाबशा काढायला लावल्या अशा गोष्टी. (हसत) त्यांना मला कशातलं काय कळतं असं वाटलंच नसेल!
प्रश्न- पक्षप्रमुख काय म्हणाले?
उत्तर- काय नाही. अभिनंदन केलं. मी म्हटलं मी माझं कर्तव्य केलं.
प्रश्न- लगेच फोन ठेवला का?
उत्तर- होय.
प्रश्न- वडिलांनी कौतुक केलेला व्हिडिओ बराच वायरल झाला आहे. तुमचे काय बोलणे झाले होते?
उत्तर- असे समोरासमोर काही बोलणे झाले नाही. मी बाहेर बसलो होतो ते आत बसले होते. आतूनच म्हणाले टायगरच्या ऑपरेशनबद्दल ऐकतोय. मी म्हटलं मी पण ऐकतोय.
ते म्हणाले तुझ्या मनात काही नाही ना?
मी म्हटलं नाही.
ते म्हणाले असलं तर काढून टाक. मी म्हटलं होय. सपला विषय !
प्रश्न- तुम्ही राजकारणात यायला फार उत्सुक नव्हता.
उत्तर- होय
प्रश्न- काय कारण?
उत्तर- हेच की. आर्थिक नुकसान होत होतं. त्याचा फटका कुटुंबाला बसत होता.
प्रश्न- पण साधे नगरसेवकसुद्धा या धंद्यात रग्गड कमावतात. मग तुम्ही?
उत्तर- मला तसं काही जमत नाही. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून लोकांनी वर्गणी काढून मला पैसे दिले. कोणी शंभर, कोणी पन्नास, कोणी पाचशे पण दिले. आणि मी निवडणुकीला उभा राहिलो.
प्रश्न- तुम्हाला कधी चमचमीत खावंसं वाटत नाही? चांगले कपडे घालावे. जोरदार मुलाखती द्याव्यात. चैन करावी. हवा करावी. दहीहंड्या उभाराव्यात. तिथे लावण्या ठेवाव्यात. हेलिकॉप्टरने जावून शेती करावी. एखादा गुरू करावा. असं नाही वाटत?
उत्तर- नाही. मला अॅसिडिटी होते. माणसाचं काम बोललं पाहिजे. आपलं नाव खराब होता नये.
प्रश्न- विकासासाठी तुम्हाला सत्ताधारी पक्षात जावंसं वाटत नाही का?
उत्तर- माझ्या मतदारसंघात सहा सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे विकासच विकास होतोय. मी आपल्या लोकांचे प्रश्न सोडवतो. ते आपले प्रश्न सोडवतात.
प्रश्न- राजकारणात येणार्या तरुणांना तुम्ही काय सांगाल?
उत्तर- सांगायचं काय त्यात? आता बदाबदा सगळीकडे गळतंय. ते बघताहेत. त्यांना ऐकू जातंय.
समारोप
निवेदीका
पैशांसाठी आणि स्वार्थासाठी सगळ्या उलाढाली होत असताना.. तुम्ही आपला निष्ठेचा झेंडा फडकत ठेवला आहे. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असताना, रोज लाजिरवाणी फुटाफूट होत असताना लोकवर्गणीतून निवडणूक लढवणारे आपण एकमेव आहात. तरुणांसाठी हे आशादायक उदाहरण आहे. स्वत:बद्दल काही न बोलता तुम्ही निरलसपणे जनतेची सेवा करत आहात. आपल्या कुटुंबियांची मान आणि शान तुम्ही उंचावली आहे. तुम्हाला या रस्त्यावर चालण्याचे बळ कायम मिळत राहो ही सदिच्छा.
उत्तर- (हात जोडत) होय.

