- सुनील मेहरोत्रा
कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी स्त्री भ्रूणहत्येच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आरोग्य विभागाच्या 70 वर्षीय माजी जिल्हा शल्यचिकित्सकाला ताब्यात घेतले.
आरोपी डॉक्टरवर त्याच्या रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात केल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, रुग्णालयात 300 हून अधिक संशयास्पद गर्भपात झाले असण्याची शक्यात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची आधीची कागदपत्रे, रुग्णांची कागदपत्रे, जप्त केलेली वैद्यकीय उपकरणे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, छाप्यानंतर डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले. पण, चौकशीदरम्यान त्याला छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला उपचारासाठी कोल्हापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, डॉक्टर बरा झाल्यावर त्याला औपचारिकपणे अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
तपासात असेही उघड झाले की, आरोपी प्रत्येक अवैध गर्भपातासाठी अंदाजे 20 हजार रुपये आकारत होता. कोल्हापूरमधील एका लॉजमध्ये चालणाऱ्या अवैध लिंगनिदान रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच मुख्य आरोपी पळून गेला. पण, दोन महिला एजंटांना जागीच अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्या दोन महिलांनी सांगितले की, जर लिंगनिदान चाचणीत स्त्री गर्भाची पुष्टी झाली, तर गर्भवती महिलांना गर्भपातासाठी या डॉक्टरच्या रुग्णालयात पाठवले जात असे. संपूर्ण नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी एक सुनियोजित सापळा रचला. पोलिसांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला नातेवाईक असल्याचे भासवून एका बनावट ग्राहकासह रुग्णालयात पाठवले. तिथे गर्भपाताची औषधे दिली जात होती आणि पुढील प्रक्रियेची तयारी सुरू होती. दरम्यान, मुख्य पोलीस पथक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयावर छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांनी गर्भपाताची औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केले.
भारतीय दंड संहितेच्या कलमांशिवाय पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक कायदा, महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा आणि गर्भधारणा आणि प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञान (PCPNDT) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये माजी जिल्हा शल्यचिकित्सकासह एकूण 7 आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टरांनी आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर दीर्घकाळ काम केले आहे. तपास यंत्रणा आता अवैध लिंगनिदान रॅकेट, दलाल आणि रुग्णालय यांच्यात कार्यरत असलेल्या नेटवर्कचा आणि त्यात आणखी कोण सामील होते याचा तपास करत आहेत.

