Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कॉमेडियन समय रैनाचा नवीन व्हिडिओ; मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच घेतली सायबर अधिकाऱ्यांची फिरकी

कॉमेडियन समय रैनाचा नवीन व्हिडिओ; मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच घेतली सायबर अधिकाऱ्यांची फिरकी

मुंबई : राज्य पोलिसांच्या सायबर विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) लघुपट (short film) आणि 'सायबर अँथम' (सायबर जनजागृती करणारे गीत) यांचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला कॉमेडियन आणि युट्युबर समय रैना हा देखील उपस्थित होता आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान एका हलक्या-फुलक्या क्षणी समय रैना याने महाराष्ट्र सायबर सेलसोबतच्या आपल्या जुन्या संबंधांबद्दल भाष्य केले आणि '1930' या हेल्पलाईन क्रमांकाबाबत एक विनोदी टिप्पणी देखील केली. samay raina with cm devendra fadnavis

आपल्या खास विनोदी शैलीत बोलताना समय रैना म्हणाला की, महाराष्ट्र सायबर सेल आणि त्याचा संबंध बराच काळ चालू आहे. मी '1930' या हेल्पलाईन क्रमांक माझ्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. कारण मला अनेकदा याच नंबरवरून कॉल येतो. यानंतर त्याने महाराष्ट्र सायबरच्या सक्रियतेची प्रशंसा करताना म्हटले की, कोणीही अमेरिकेत असो वा भारतात असो, महाराष्ट्र सायबर त्याला तिकडे जाऊन पकडेल. यानंतर तो म्हणाला की, सायबर विभागाचे अधिकारी एखाद्या कॉमेडियनच्या घरी त्याला अटक करण्यासाठी नाही, तर मंचावर बोलावून त्याचा सन्मान करण्यासाठी आले होते, अशी ही पहिलीच वेळ होती. तर दुसरीकडे तंत्रज्ञानाची जाण असलेल्या ऑनलाइन प्रेक्षकांपर्यंत जनसुरक्षेचे संदेश थेट पोहोचवण्यात समय रैना याच्यासारख्या लोकप्रिय इन्फ्लुएन्सर्स आणि डिजिटल क्रिएटर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.

बिस्किट्स घेऊ का?

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समय रैनाचा सत्कार करण्यात आला, तेव्हा त्याने आणखी एक गोष्ट केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवलेले बिस्किट्स समय रैनाने पाहिले आणि मी एक बिस्किट्स घेऊ का? अशी विचारणा फडणवीस यांच्याकडे केली. समय रैनाच्या या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनीही होकार दिला. समय रैनाने बिस्किट्स उचलेले आणि तो माघारी परतला. मात्र समय रैनाच्या या कृतीने देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्याठिकाणी उपस्थित सगळ्यांनाच हसू आले.

'डिजिटल अरेस्ट' नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही

कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'डिजिटल अरेस्ट' नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. सायबर फसवणूक झाल्यानंतरचा लगेचचा काळ ज्याला 'गोल्डन अवर' किंवा अत्यंत महत्त्वाचे सुरुवातीचे तास म्हटले जाते, हा गमावलेला पैसा परत मिळवण्यासाठी अत्यंत मोलाचा असतो. या काळात तक्रार दाखल केल्यास व्यवहार थांबवण्याची किंवा फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्याची शक्यता अधिक असते, असे फडणवीस यांनी नमूद केले. तसेच फसवणुकीनंतर उशीर झाल्यास पैसे परत मिळवणे अत्यंत कठीण होते, कारण अनेकदा ती रक्कम विविध बँक खात्यांमधून फिरवली जाते. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात येताच 1930 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र सायबर सेफ ॲप

दरम्यान, महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांनी प्रस्तावित 'महाराष्ट्र सायबर सेफ ॲप' (Maharashtra Cyber ​​Safe App) आणि 'आशा कॉल बॉट' (Asha Call Bot) या प्रकल्पांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात अभिनेते आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी आणि मंगेश देसाई, तसेच गायिका सुनिधी चौहान आणि युट्युबर समय रैना यांचा चित्रपट आणि 'सायबर अँथम'मधील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar