Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे घोडे अडते कुठे?

काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे घोडे अडते कुठे?

अभिजीत दीपके यांनी देशातील तरुणाईला केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात चेतवल्यानंतर आता आपण जेन झीसोबत संवाद साधायला हवा, हे पंतप्रधान मोदींच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ जेन झीला जवळ असलेल्या इन्स्टाग्रामचा वापर करून संवादाला सुरुवात केली.

आता याच वेळी जर काँग्रेसने प्रियांका गांधी यांना अशाच प्रकारे तरुणाईशी संवाद साधण्यासाठी उतरवले तर नक्कीच त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो, पण त्यासाठी सोनिया गांधींची परवानगी लागेल. काँग्रेस आणि पर्यायाने इंडिया आघाडीचे घोडे इथेच अडले आहे.


कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाने पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला झुकवले. संसदेत घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलक तरुण-तरुणींना पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर आंदोलन चिघळले. त्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर जाऊन ठिय्या धरला आणि आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही तिथून उचलून नेले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर अभिजीत दीपके भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, सुबह हो गयी मामू, आता आम्ही गप्प बसणार नाही. ही तर सुरुवात आहे. त्यांच्या बोलण्याप्रमाणे त्यांनी संसदेसमोर जी आंदोलकांना आक्रमकपणे मारहाण झाली, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार ठरवून आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अभिजीत दीपके यांना देशातील तरुणाईचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे संसदेत विरोधी बाकांवर असलेल्या 'इंडिया आघाडी'तील पक्षांच्या पंखात नवे बळ संचारले आहे. कारण इंडिया आघाडीने मागील लोकसभा निवडणुकीत मोदींना हटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. त्याला कारण होते की, त्या घटक पक्षांमध्ये मोदींना हटवण्यावर एकमत होते, पण जेव्हा निवडणूक जवळ आली, तेव्हा त्यांच्यात मतभेद होऊ लागले, त्यांच्यात जागावाटपावरून मोठी स्पर्धा झाली. त्यांचा मेळ बसला नाही, त्यामुळे मग ते घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीत लढले. त्याचा फायदा भाजपला झाला. भाजपला बहुमत मिळाले नाही तरी पण त्यांची केंद्रात सत्ता आली. या मागील मुख्य कारण म्हणजे इंडिया आघाडीकडे सर्वमान्य नेतृत्व नाही. भाजपकडे जमेची बाजू तीच आहे. त्यांच्याकडे मोदींचे सर्वमान्य नेतृत्व आहे.

इंडिया आघाडीमध्ये प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. यावेळी म्हणजेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा प्रभाव जास्त असेल, अशीच एकूण परिस्थिती दिसत आहे. आता मोदींनीही वयाची ७५ वर्षे पार केली आहेत. त्यातही मोठ्या संख्येने मतदान करणार्‍या तरुणांना नवा चेहरा हवा असतो. त्याचे उदाहरण म्हणजे २००४ साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीएची आलेली केंद्रातील सत्ता. त्यावेळी पुन्हा भाजपचेच सरकार येणार म्हणून तेव्हाचे भाजपचे प्रमुख नेते प्रमोद महाजन यांनी शायनिंग इंडिया मोहीम सुरू केली होती. त्यावेळी भाजपकडे अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. पण त्यावेळी त्यांचे वय झालेले होते. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने सोनिया गांधी प्रचारात उतरल्या. त्यांच्या नव्या चहर्‍याने आणि वाजपेयींच्या तुलनेत बर्‍याच तरुण आणि तडफदार दिसणार्‍या व्यक्तिमत्वाने जनमत त्यांच्याकडे खेचून आणले. त्यामुळे काँग्रेस हा युपीएमधील जास्त जागा जिंकणार पक्ष ठरला. भाजपची पिछेहाट झाली. सोनिया गांधींमुळे युपीएची सत्ता आली. त्यामुळे अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांना पंतप्रधानपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला, पण सोनिया गांधी यांनी आपला अंतरात्म्याचा आवाज ऐकून पंतप्रधानपद नाकारले. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण ३०० पार केले आहेत. आता अयोध्येत राम मंदिरही उभारण्यात आले आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण ४०० पार करणार असे भाजप नेत्यांना वाटत होते, पण जसे मतदानाचे टप्पे पार पडू लागले, तसे आपल्याला मिळणारा प्रतिसाद कमी आहे, असे भाजप नेत्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यामुळे पंतप्रधानपदी असलेल्या नरेंद्र मोदी यांनी हिंदू-मुस्लीम हा विषय घेऊन हिंदू मते भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनेकांनी आक्षेपही घेतला. उलट, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला साधे बहुमतही मिळू शकले नाही, त्यामुळे मोदींसह भाजप नेत्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला. त्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्या पक्षांच्या आधारे नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले, पण त्यांच्या सरकारचे जे स्थैर आहे ते या दोन बाबूंच्या लहरीवर अवलंबून आहे. यांच्यापैकी कुणाची काही कारणावरून लहर फिरली तर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळू शकते.

सध्या कॉक्रोच जनता पार्टीमुळे देशातील तरुणाईमध्ये जो जोश निर्माण झाला आहे, त्याचा फायदा सगळ्याच राजकीय पक्षांना घ्यायचा आहे. अभिजीत दीपके यांची ताकद आता राजकीय पक्षांना कळलेली आहे. तसेच दीपके यांनी मोदी सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ज्या विरोधी पक्षांना मोदींना हटवण्याची मनोमन इच्छा आहे, त्यांच्यासाठी अभिजीत दीपके यांच्या रुपाने नवे हत्यार मिळाले आहे. त्यामुळे तरुणाईचा आवाज म्हणून अभिजीत दीपके यांना सगळेच राजकीय पक्ष आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता पुढील काळात अभिजीत दीपके कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात, यावर बर्‍याच गोष्टी ठरणार आहेत. जंतर मंतरवर सगळ्यात प्रथम त्यांना उद्धव ठाकरे भेटून आले होते. आम आदमी पार्टीचे त्यांना समर्थन आहे, कारण त्यांनी त्यात अगोदर काम केलेले आहे.

दीपके पुढील भूमिका काय घेतात, याकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. ते प्रतिकात्मक अशा कॉक्रोच जनता पार्टीचे राजकीय पक्षात रुपांतर करतात का, कारण त्यांच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे दुसर्‍या पक्षांच्या पालखीचे भोई होण्यापेक्षा स्वत:चा वेगळा पक्ष ते काढतात का, कारण अरविंद केजरीवाल यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत काँग्रेसच्या केंद्रीय सत्तेच्या विरोधात आंदोलन करताना आपला आम आदमी पार्टी हा स्वतंत्र पक्ष काढला होता. त्यातून ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्या राज्यात त्यांना हवी होती, तशी धोरणे राबवली. दीपके यांना स्वत:चा राजकीय पक्ष स्थापण्याविषयी विचारल्यावर ते म्हणतात, 'आम्ही सत्ता मागायला नाही, व्यवस्था बदलायला आलो आहोत.' पण राजकारणाचा नियम आहे की जोपर्यंत तुम्ही सत्तेत जात नाही तोपर्यंत व्यवस्था बदलू शकत नाही. हे वास्तव दीपके यांच्या नंतर लक्षात येईल. कारण उद्या भाजपच्या जागी काँग्रेस असेल इतकाच फरक असेल. केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून जनतेने मोदींना बहुमत दिले होते. कारण तुम्हाला देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल तर भारताला काँग्रेसमुक्त करावे लागेल, असे आवाहन मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते. त्यावेळच्या तरुणाईने सोशल मीडियाचा वापर करून मोदींना मोठा प्रतिसाद देत त्यांना बहुमत मिळवून दिले होते.

अभिजीत दीपके म्हणत आहेत की, आम्ही कुणाच्या सत्तेत भाग घेणार नाही. सत्तेच्या बाहेर राहून व्यवस्थेत बदल करणार. काल काँग्रेसने चुका केल्या म्हणून लोकांनी त्यांच्या जागी केंद्रात भाजपला निवडून दिले. त्यावेळी दिल्लीत अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आंदोलनाचा भाजपला फायदा झाला होता. आता संसद भवनासमोर पोलिसांनी जो लाठीमार केला, तशी धरपकड रामदेव बाबा आणि त्यांच्या आंदोलकांची दिल्ली पोलिसांनी रामलीला मैदानात केली होती. त्यावेळीही पोलिसांनी आंदोलकांना अमानुष मारहाण केली, महिलांचा विनयभंग केला, असा आरोप रामदेव बाबांनी केला होता. आता भाजपने चुका केल्या म्हणून अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली तरुणाई एकवटत आहे. तुम्ही सत्तेत असताना जी चांगली कामे करता ते तुमचे कर्तव्य असते, तुम्ही काय चुका केल्या, ज्याचा लोकांना त्रास होतो, ते जनता लक्षात ठेवते. तेच मुद्दे विरोधी पक्षही उचलून धरत असतात.

अभिजीत दीपके यांनी तरुणाईला आपल्याकडे खेचलेले आहे, हे लक्षात घेऊन आता आपण देशातील तरुणाईला नाराज करून चालणार नाही. त्यांना आपल्याकडे खेचायला हवे, म्हणूनच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्याही पुढे जाऊन जेन झीला जवळ असलेल्या इन्स्टाग्रामचा आधार घेतला. जेन झी जास्त अ‍ॅक्टिव्ह असते ती रात्रीची वेळ साधून त्यांच्याशी अल्प शब्दात संवाद साधायला सुरुवात केली आहे, कारण दीर्घ संवाद हा जेन झीला कंटाळवाणा वाटतो, हे मोदींनी हेरले आहे. इतकेच नव्हे तर आता भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झी आणि त्यांच्या पुढच्या जेन अल्फा यांच्याशी संवाद साधायचे ठरवले आहे. पण यावर मात करण्यासाठी काँग्रेसकडे प्रभावी व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे खासदार प्रियांका गांधी.

काँग्रेसने प्रियांका गांधी यांना पुढे आणले, तर आजही तरुणाई आणि जनमत त्यांच्याकडे खेचले जाऊ शकते. जसे २००४ साली सोनिया गांधी यांच्या करिश्म्याने घडले होते. राहुल गांधी खूप मेहनत घेतात, पण त्यांचा प्रभाव पडत नाही. अभिजीत दीपके यांनी प्रभारित केलेल्या तरुणाईला आपल्या बाजूने खेचून केंद्र सरकारच्या विरोधात वापरायचे असेल तर ते काम प्रियांका गांधी करू शकतात. त्यातून इंडिया आघाडीला आवश्यक असलेले सर्वमान्य नेतृत्व देण्याची ताकद त्यांच्यात आहे, पण यासाठी सोनिया गांधी यांची मान्यता असावी लागेल. कारण त्या पुत्रप्रेमात अडकल्या आहेत. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे घोडे तिथेच अडले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar