वसई : क्षयरोगावरील उपचारांसाठी वसई-विरारमधील रुग्णांना आता मुंबईपर्यंत धाव घेण्याची गरज भासणार नाही. रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वसई-विरार महानगरपालिकेने तुळींज येथील रुग्णालयात स्वतंत्र क्षयरोग निवारण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, उपचारांसोबतच रुग्णांना महापालिकेच्या निधीतून पौष्टिक आहारही दिला जाणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसोबतच रुग्णांच्या पोषणाचीही काळजी घेतली जाणार आहे.सध्या क्षयरोगाच्या उपचारांसाठी अनेक रुग्णांना सायन किंवा शिवडी येथील रुग्णालयांमध्ये जावे लागते. रेल्वेतील गर्दी, लांबचा प्रवास आणि दाट लोकवस्तीच्या भागात संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेता स्थानिक पातळीवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यावर महापालिकेने भर दिला आहे. शहरात आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार क्षयरुग्णांची नोंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विविध भागांत जनजागृती, रुग्णांची तपासणी आणि छोट्या एक्स-रे मशीनच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबवली जात आहे. तसेच रुग्णांच्या कुटुंबीयांचीही तपासणी केली जात आहे.या उपक्रमातील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे रुग्णांना दिला जाणारा पौष्टिक आहार. यापूर्वी रुग्णमित्रांच्या माध्यमातून सहा महिन्यांपर्यंत आहार पुरवला जात होता. मात्र, ही सुविधा सर्व रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याने आता महापालिका स्वतःच्या निधीतून आहार उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे, हा आहार तयार करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचे निर्देश महापौर अजीव पाटील यांनी दिले आहेत. यामुळे क्षयरुग्णांना पोषण आहार मिळण्यासोबतच महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी मिळणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली.

