- प्रा. डॉ. अविनाश कोल्हे
'ड्रीम्स' या चित्रपटात कुरोसावाने मॅजिक रिअॅलिझमचा वापर करून आठ स्वप्नकथा दाखवल्या आहेत. ही आठही स्वप्नं आहेत. या आठ स्वप्नांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
हा चित्रपट आठ स्वप्नांवर आधारलेला असल्यामुळे यात 'आदीमध्यअंत' असे सलग कथानक नाही. मात्र यातील काही स्वप्नांतून कुरोसावाने आधुनिक जग, तंत्रवैज्ञानिक प्रगती तसेच पर्यावरणाचा र्हास वगैरेंच्या विरोधात ठसठशीत भूमिका घेतलेली दिसते.
विसाव्या शतकातील जगातील महान सिनेदिग्दर्शकांची यादी केली तर यात जपानचे अकीरा कुरोसावा आणि भारताचे सत्यजित रे, यांची निवड हमखास केली जाईल. या दोघांनी दर्जेदार आणि कलात्मक चित्रपटांद्वारे आशियार्इ संवेदनशिलता जगासमोर आणली. अकीरा कुरोसावा (19101998) म्हटलं की 1950 साली आलेला 'राशोमान', 1954 साली आलेला 'सेव्हन सामुराई' वगैरे गाजलेले चित्रपट डोळ्यांसमोर येतात. मात्र याच कुरोसावांनी 1990 साली 'ड्रीम्स' नावाचा आगळा चित्रपट बनवला होता. अभ्यासकांच्या मते कुरोसावांचे इतर चित्रपट एका बाजूला आणि हा 'ड्रीम्स' दुसर्या बाजूला. जसं 1982 साली साहित्याचं नोबेल मिळवणार्या गॅब्रिएल गार्सिया मार्केझची 1967 साली आलेली 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड' किंवा 1975 साली आलेली 'द ऑटम ऑफ द पॅट्रीआर्क' वगैरे कादंबर्या एका बाजूला आणि 1985 साली आलेली 'लव्ह इन द टाईम ऑफ कॉलरा' ही कादंबरी दुसरीकडे. असाच काहीसा प्रकार कुरोसावाच्या या चित्रपटाबद्दलही दाखवता येतो.
'ड्रीम्स' या चित्रपटात कुरोसावाने मॅजिक रिअॅलिझमचा वापर करून आठ स्वप्नकथा दाखवल्या आहेत. ही आठही स्वप्नं आहेत. या आठ स्वप्नांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. हा चित्रपट आठ स्वप्नांवर आधारलेला असल्यामुळे यात 'आदीमध्यअंत' असे सलग कथानक नाही. मात्र यातील काही स्वप्नांतून कुरोसावाने आधुनिक जग, तंत्रवैज्ञानिक प्रगती तसेच पर्यावरणाचा र्हास वगैरेंच्या विरोधात ठसठशीत भूमिका घेतलेली दिसते.
स्वप्नांच्या जगात काहीही शक्य असतं. यामुळेच एका स्वप्नात चक्क सुप्रसिद्ध चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग दाखवला आहे. तेसुद्धा चित्र काढताना. एक जपानी तरुण चित्रकार गॉगचा चाहता असतो. कुरोसावाने या जपानी तरुणाला गॉगच्या सर्व महत्त्वाच्या चित्रांत फिरवून आणले असते. नंतर तो तरुण व्हॅन गॉगला भेटायला त्याच्या गावात जातो आणि नदीवर कपडे धुत असलेल्या महिलांना गॉगचा ठावठिकाणा विचारतो. त्या गॉगचा पत्ता सांगतात आणि त्याला सावध करतात, 'बाबा रे. सांभाळून राहा. तो नुकताच वेड्यांच्या इस्पितळातून बाहेर आला आहे'. तरुण जपानी चित्रकार गॉगला शोधतो. त्याला दिसते की स्वत:चा कान कापून टाकणार्या गॉगने दोन्ही कान झाकून टाकेल असा रूमाल बांधला आहे. व्हॅन गॉग त्या तरुणाला सांगतो 'अरे चित्र काढ. बघत काय बसला आहेस? किती कमी वेळ आहे माझ्याजवळ आणि किती चित्रं काढायची आहेत'. या आठ स्वप्नांत मला सर्वात जास्त आवडलेलं स्वप्न हे आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे यातील व्हॅन गॉगची भूमिका मार्टिन स्कॉर्सेसी यांनी केली आहे!
या सिनेमातील पहिलं स्वप्न म्हणजे एक लहान मुलगा जंगलात सुरू असलेलं कोल्ह्याचं लग्न चोरून बघतो. सूर्य तळपत असताना पाऊस पडत असला की कोल्ह्याचं लग्न लागतं, असा समज आहे. अशी लग्नं लहान मुलांनी बघू नये, असा संकेत असतो. हे लग्न बघून आल्यामुळे मुलाची आई त्याला घरात घेत नाही़. उलट एक चाकू देते आणि कोल्ह्याची माफी मागून ये. माफी मिळाली नाही तर याच चाकूने स्वत:चा जीव घे, असं सांगते. या विलक्षण स्वप्नापासून सिनेमाची सुरूवात होते.
दुसर्या स्वप्नात पुन्हा एक लहान मुलगा आहे. त्याचे पालक त्यांच्या घराजवळ असलेली बाग कापून टाकतात. याचं मुलाला दु:ख होतं. याबद्दल एक बाहुली मुलाचा धिक्कार करते. अशी सुंदर बाग कापून टाकल्याबद्दल मुलाला खरोखर दु:ख झालं आहे, हे लक्षात आल्यावर बाहुली चमत्कार करून ती बाग काही सेकंदांसाठी पुन्हा निर्माण करते, मुलाला दाखवते आणि नंतर सर्व काही अदृश्य होते़.
तिसर्या स्वप्नात चार गिर्यारोहक एका उंच डोंगरावर बर्फाच्या वादळाचा सामना करत असतात. सतत तीन दिवस सुरू असलेल्या त्या राक्षसी वादळासमोर तीन गिर्यारोहक शरण जातात. चौथा त्यांचा नेता मात्र प्रयत्न सोडत नाही आणि इतरांना सतत प्रेरणा देत असतो. अशा स्थितीत एक सुंदर स्त्री येते आणि त्याला प्रयत्न सोडून दे आणि शांतपणे मृत्यूला सामोरं जा, असा सल्ला देते. तो याकडे दुर्लक्ष करतो आणि प्रयत्न सुरूच ठेवतो. शेवटी वादळ ओसरते आणि ते सर्व सुखरूप राहतात. सुरूवातीची ही तीन स्वप्नं आणि पाचवे स्वप्न व्यक्तिगत स्वरूपाची आहेत. पाचव्या स्वप्नात एक तरुण विन्सेंट गॉगला भेटतो.
मधले चौथे सैनिकांबद्दलचे आणि नंतरची स्वप्नं मात्र कुरोसावाची सामाजिक भूमिका मांडतात. चौथ्या स्वप्नात एक तरुण लष्करी अधिकारी आणि त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे मृत्युमुखी पडलेली सैनिकांची पलटण समोरासमोर येते. अधिकारी स्वत:च्या चुकीच्या निर्णयामुळे खजिल झालेला असतो. त्याच्या निर्णयाचा आणि एकूणच युद्धाचा निषेध करणारा भुंकत असलेला कुत्रा ही प्रतिमा वापरत हे स्वप्न संपते. यातील युद्धविरोधी भूमिका स्पष्ट आहे. नंतरच्या स्वप्नात जपानमधील ज्वालामुखी फुजी पर्वत आणि त्याच्या शेजारी अणुभट्टी दाखवली आहे. या अणुभट्टीत अचानक गळती सुरू झाल्यामुळे सर्वत्र पळापळ सुरू झाली आहे.
शेकडो लोकांनी समुद्रात उड्या मारल्या आहेत. समुद्र किनार्यावर आता दोन लहान मुलांची आई, एक तरुण आणि एक मध्यमवयीन पुरुष उरले आहेत. तो मध्यमवयीन पुरुष निर्वाणीच्या आवाजात अणुभट्ट्यांचे तोटे सांगतो. ती स्त्री म्हणते, 'आपलं सर्व झालं आहे, पण माझ्या लहानग्यांचं काय?' यात कुरोसावाने निसर्गनिर्मित फुजी ज्वालामुखी आणि माणसाने निर्माण केलेल्या अणुभट्ट्या, बाजूबाजूला ठेवून अणुशक्तीच्या विरोधात जबरदस्त भूमिका घेतली आहे. नंतरचं स्वप्न या अण्वस्त्रविरोधी भूमिकेला पूरक आहे. यात एका तरुणाला डोंगरावर एक राक्षस भेटतो. तो सांगतो की अणुबॉम्ब पडल्यावर आम्ही राक्षस झालो. अशा प्रकारे राक्षस झालेल्यात आधीचे करोडपती, उद्योगपती आहेत. तो राक्षस सांगतो की आम्हाला असह्य वेदना होत असतात. पण आमची यातून सुटका नाही.
कुरोसावाची भूमिका शेवटच्या स्वप्नात अधिकच धारदार होते. यात एक नाव नसलेलं छोटं गाव दिसतं. यात मोठी नदी, तिच्या किनार्यावर पाणचक्क्या असतात. गावात कमालीची शांतता दाखवली आहे. गावात वीज नसते, म्हणून मग विजेवर चालणारे पंखे वगैरे साधनं नसतात. जिन्सची पँट घातलेला आणि आधुनिक मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारा एक तरुण गावात प्रवेश करतो. त्याला 103 वर्षांचा म्हातारा भेटतो. त्यांच्या गप्पा म्हणजे हे स्वप्न. म्हातारा सांगतो की तुम्ही आधुनिक शोध लावले आणि जगणं दु:खी करून घेतलं. यामुळे तुम्हाला जीवनातील आणि निसर्गातील आनंद घेता येत नाही. म्हातारा पुढे सांगतो की, तो आता एका प्रेतयात्रेत नाचायला, गायला जाणार आहे. प्रेतयात्रेत नृत्य? गायन?. कारण साधं आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तिचं वय 98 होतं. म्हणजे ती व्यक्ती तृप्त जगली आणि आता वारली. याचं दु:ख करायचं नाही. तर एवढी वर्षं आनंदाने जगली, याचा उत्सव करायचा असतो. म्हणून असं नृत्य आणि गायन. अर्थात आम्ही तरुणांच्या, लहान मुलांच्या मृत्यूचा शोक करतो, पण 98 वर्षं जगलेल्या व्यक्तीचा मृत्यू साजरा करतो. विन्सेंट गॉगच्या स्वप्नाखालोखाल मला आवडलेलं दुसरं स्वप्न!
वर उल्लेख केल्याप्रमाणे कुरोसावाच्या या सिनेमाला पारंपरिक कथानक नाही. तरी हा सिनेमा रसिकांना खिळवून ठेवतो. स्वत:ला वेळोवेळी पडलेल्या स्वप्नांतून कुरोसावाने एक आगळाच चित्रपट बनवला आहे. यातील छायाचित्रण, कॅमेर्याचा वापर हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. नंतरच्या स्वप्नांतून कुरोसावाने घेतलेल्या आधुनिकतेच्या विरोधातील भूमिकेचा समर्थ प्रतिवाद करता येतो. अनेकांनी केलेलासुद्धा आहे. मात्र केवळ सिनेमा म्हणून हा चित्रपट फार सुंदर आहे, यात शंका नाही.

