मुंबई : विविध तांत्रिकी, अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मुंबईतील मध्य आणि हार्बर या दोन्ही रेल्वे मार्गांवर उद्या (02 ऑगस्ट) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या दिवसाच्या वेळेस कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.
त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील सर्व गाड्या या नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू राहणार आहेत. मात्र मध्य आणि हार्बरवरील मेगा ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या रद्द तर, काही उशिराने धावण्याची शक्यता आहे. तसेच, काही एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम जाणवणार आहे. हे देखभाल व दुरुस्तीचे मेगा ब्लॉक रेल्वेतील पायाभूत सुविधांच्या देखरेख व सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असून यादरम्यान प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसारच त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. central and western railway mega block
मध्य रेल्वे
कुठे - माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान
कधी - रविवारी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत
परिणाम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या 'डाऊन' जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथून 'डाऊन' धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे येथून पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथून पुन्हा 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 या वेळेत सुटणाऱ्या 'अप' जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर 'अप' धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील, माटुंगा येथून पुन्हा 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर रेल्वे
कुठे - सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान
कधी - रविवारी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत
परिणाम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर लाईनवरील गाड्या आणि सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर लाईनवरील गाड्या रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या 'अप' हार्बर लाईनवरील सेवा बंद राहतील. ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक 8) दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉकच्या कालावधीत हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम लाईन वरून प्रवास करण्याची मुभा असेल.
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक
पश्चिम रेल्वेद्वारे शनिवार/रविवार म्हणजेच 01/02 ऑगस्टच्या मध्यरात्री मुंबई सेंट्रल आणि माहिम स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा जम्बो ब्लॉक 02 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 00.25 ते पहाटे 04.25 वाजेपर्यंत अप आणि डाऊन फास्ट (जलद) मार्गांवर घेतला जाईल. ब्लॉकच्या कालावधीत सर्व फास्ट लोकल ट्रेन्स चर्चगेट ते सांताक्रुझ स्थानकांदरम्यान स्लो (धीम्या) मार्गावरून चालवल्या जातील. त्यामुळे उद्या (02 ऑगस्ट) पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसभरात कोणताही जम्बो ब्लॉक राहणार नाही.

