चांदवड-मनमाड रस्ता खड्ड्यात
नाशिक -चांदवड-मनमाड मार्गावर अर्धवट राहिलेल्या कामांमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मार्गावरील तीन ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
चांदवड-दुगाव रस्त्यावरील निकम वस्ती परिसरात पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. तसेच शिंगवे बारीजवळ रस्त्याचे काँक्रिटीकरण न झाल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे.
नवनाथ वाघमारेंविरुद्ध मराठा आक्रमक
बारामती -नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिला आणि तरुणींबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. नवनाथ वाघमारेंविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मराठा समाजाच्या तरुणांनी इंदापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांकडून 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देण्यात आल्या. वाघमारेंच्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, पोलिसांनी तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
मुक्ताईच्या पालखीचे जल्लोषात स्वागत
जळगाव - आषाढी यात्रेसाठी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेल्या आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी मुक्ताईनगरमध्ये भक्तिमय वातावरणात जोरदार स्वागत करण्यात आले. आषाढी यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात असलेली मुक्ताईची पालखी मुक्ताईनगरमध्ये दाखल होताच भाविकांनी मोठी गर्दी केली. शेकडो दिंड्या, टाळ-मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. संपूर्ण मुक्ताईनगर नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली.
भाजपविरोधात भीमशक्तीचे मुंडन आंदोलन
जालना - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी भीमशक्ती संघटनेने मुंडन आंदोलन केले. यावेळी भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या जातीवादी धोरणाविरोधात संताप व्यक्त केला. मुंडन करून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. आगामी काळात खासदार चंद्रकांत हंडोरे जे आदेश देतील, त्यानुसार आंदोलन करण्याची भूमिका भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.
तहसील कार्यालयावर आदिवासींचे आंदोलन
रायगड - खालापूर तहसील कार्यालयावर वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करण्यात आले. दस्तुरी येथील मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या कामासाठी एमएसआरडीसी प्रशासनाने आदिवासी समाजाची जमीन संपादित केली होती. मात्र, या जमिनी नापीक झाल्या असून, जमिनीचे भाडे देण्यासही प्रशासनाकडून नकार दिला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जमिनीचा मोबदला तातडीने देण्यात यावा, अन्यथा संबंधित विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
स्पायडरमॅनसारखा भिंतावरून चढून चोरी
अमरावती -अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने पर्दाफाश केला आहे. तब्बल ४९८ ग्रॅम सोने आणि दोन लाख रुपये रोख चोरीला गेल्याच्या या प्रकरणात अकोल्यातील अल्पवयीन मुलाला नागपुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले. या मुलाने समोरील दरवाजा न तोडता मागील सर्व्हिस गल्लीतून थेट स्पायडरमॅनसारखा चढून घरफोडी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अकोल्यात ९ घरफोड्या केल्यानंतर तो अमरावतीत आला होता.
पिकविम्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार
बीड - जिल्ह्यात पिकविम्याच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा संताप मंगळवारी रस्त्यावर उतरला. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे शेतकऱ्यांनी भव्य रास्ता रोको आंदोलन करत पंढरपूर-खामगाव राष्ट्रीय महामार्ग तब्बल एक तास ठप्प केला होता. २०२५-२६ या वर्षात खरीप हंगामातील हेक्टरी १७ हजार ५०० रुपये पिकविमा रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानचे विशाल जाधव यांचे माजलगाव येथे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पात्रुड येथील शेतकरी, युवक आणि ग्रामस्थ लवूळ फाट्यावर मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
कामाच्या तणावामुळे डॉक्टरांची आत्महत्या
बुलढाणा - मेहकर तालुक्यातील मांडवा उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप हाडे (३७) यांनी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केल्यानंतर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एनक्यूएएस मूल्यांकनाची तयारी, साधनांचा अभाव आणि वरिष्ठांकडून आलेला प्रचंड ताण याला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप आरोग्य अधिकारी संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे, खुद्द जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीदेखील डॉ. हाडे कामाच्या मानसिक ताणात असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणामुळे शेतकरी संतप्त
चंद्रपूर - घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप उसगावमधील शेतकऱ्यांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागण्यांकडे लक्ष न दिल्यास २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. कारखान्यातून सोडले जाणारे प्रदूषित पाणी आणि रासायनिक कचरा नाल्यात मिसळत असल्याने शेती तसेच पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे पाणी शेतीसाठी वापरता येत नाही, तसेच जनावरांसाठीही ते धोकादायक असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
गोमूत्र शिंपडल्याच्या घटनेचा निषेध
पुणे -उत्तराखंडमध्ये १२ ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेसच्या सभेनंतर सभास्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आल्याच्या आरोपावरून भीमशक्ती संघटना आक्रमक झाली आहे. मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजाचे असल्याने काही हिंदुत्ववादी संघटनांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भीमशक्ती संघटनेच्या वतीने मल्लिकार्जुन खरगे यांच्या छायाचित्राला दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच मुंडन करून कथित प्रकाराचा निषेध नोंदवण्यात आला.
अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करा
नागपूर - सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय, छळ तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन करण्यात यावे, अशी मागणी सफाई कर्मचारी कार्यकर्ते विक्की बढेल यांनी केली आहे. धर्मपेठ झोनचे झोनल अधिकारी भासनवार यांनी एका सफाई कर्मचाऱ्याला नोटीस बजावल्याचा आरोप करत, संबंधित कर्मचाऱ्याने बदलीसाठी अर्ज करूनही अद्याप त्याची बदली करण्यात आलेली नसल्याचे बघेल यांनी सांगितले. तसेच अधिकाऱ्यांकडून सभापतींच्या नावाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुजराती समाजाचे धरणे आंदोलन
अकोला -शहरातील एमआयडीसी परिसरात २० एप्रिल रोजी तुषार सायानी यांचा अपघाती मृत्यू झाला होता.मात्र, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी मंगळवारी सकल अकोला गुजराती समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने आणि कठोर कारवाई केली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

