Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोखाड्यात रोजगारामागे भटकणार्‍या आदिवासींना आधार मिळेना

मोखाड्यात रोजगारामागे भटकणार्‍या आदिवासींना आधार मिळेना

नामदेव ठोमरे, मोखाडा : तालुक्यातील विविध गावांमधील अनेक आदिवासी कातकरी ग्रामस्थ आधार कार्डविना वंचित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.यातील बहुतांश जणांना स्वतःची जागा, जमीन नाही. त्यामुळे हा समाज आपल्या उदरनिर्वाहासाठी पावसाळा संपताच शहराकडे जातो.

पुन्हा पाऊस चालू झाला की आपल्या घराकडे येतो. त्यामुळे रोजगाराच्या या चक्रात अडकलेल्या या आदिवासींना शिबिरांना उपस्थित राहाता येत नाही आणि ते आधार कार्डपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने योग्य ते नियोजन करून या समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत,अशी मागणी होत आहे.

शिक्षण घेऊन आयुष्य घडविण्याचे स्वप्न पाहणार्‍या आदिवासी कातकरी समाजातील युवकांवर आधार कार्ड अभावी मजुरीचे काम करण्याची वेळ आली आहे.याचेच एक उदाहरण म्हणजे, तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत हद्दीत राजेवाडी या गावात रहिवास असलेल्या विष्णू देवराम भोई या युवकाने शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारेगाव येथे मार्च २०१६ रोजी बारावी पासपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर शासकीय योजना नोकरी रोजगारासाठी लागणार्‍या कागदपत्राची जुळवा जुळव करताना आधार कार्डची कमी येत असल्याने त्याने अनेक ठिकाणी आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आज दहा वर्ष होऊन देखील त्यास आधार कार्ड मिळत नसल्याने रोजगार शासकीय योजना नोकरी संदर्भातील फॉर्म भरण्यासाठीआवश्यक कागदपत्रांच्या प्रक्रियेत आधार कार्डची कमी येत आहे. शिक्षण घेऊनही कागदोपत्री ओळख अभावी हा तरुण मजुरीच्या विळख्यात सापडला आहे.

अनेक युवक- युवती वंचित

तालुक्यात केवळ या एका युवकाची ही समस्या नसून शिक्षण घेतलेलेआदिम समाजातील अनेक युवक- युवती आधार कार्ड विना रोजगारासाठी शहराकडे वेट बिगारी मोलमजुरी करत आहेत.एकीकडे इतर जातीत आरक्षण मागण्यासाठी जीवाची परवा न करता उपोषण केले जाते. मात्र आदीम कातकरी आदिवासी समाजातील मुलांनी 'शिक्षण घेतले, पण आधार ओळखपत्रच नाही; मग रोजगाराच्या संधी कुठून मिळणार? कोट्यवधीचे आदिवासी अनुदान हे कशासाठी' खर्च होते असा सवाल आदिवासी समाज करत आहे. याबाबत तहसील मोखाडा यांच्या यंत्रणेने तालुक्यातील ग्रामपंचायतीनुसार कातकरी समाजातील वस्ती, गाव, पाडे याठिकाणी जनजागृती शिबीर लावून आधार कार्ड नसलेल्या व्यक्ती शोधून त्यांना तातडीने आधार कार्ड मिळवून द्यावे आणि शिक्षण घेतलेल्या तरुण तरुणांची अडचण करावी, अशी मागणी या समाजातून होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar