मुंबई : गेल्या काही महिन्यात राज्यात विविध विषयांचे पेपर फुटल्याचे उघडकीस आले आहे. अशातच आता एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीने तर खळबळच उडवून दिली आहे. कारण, या प्रकरणात दररोज नवनवीन नावे समोर येत आहेत आणि त्यांच्याबाबत धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे.
या प्रकरणात एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते, परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि पेपरफुटी प्रकरणातील कथित सूत्रधार असलेले कौटिल्य क्लासेसचे संचालक प्रवीण पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. परंतु, आता हाच प्रवीण पाटील आणि सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्यातील जुने कनेक्शन उघड झाले आहे. MPSC drug inspector exam paper leak
अटक करण्यात आलेला एमपीएससीचा सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे हा कौटिल्य क्लासेसचा माजी विद्यार्थी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गोपाळ मराठे आणि कौटिल्य क्लासेसचा संचालक प्रवीण पाटील हे दोघेही एकाच गावातील असून यांच्यामध्ये नियमित संपर्क होत होता. त्यामुळे या मराठेनेच प्रवीण पाटीलपर्यंत ही प्रश्नपत्रिका पोहोचवण्यास मदत केली का? पैसे घेऊन ते एमपीएससीतील अन्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मराठेचा सहभाग होता का? याचा तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या तपासानुसार, एमपीएससीचे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकटे यांना तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नांपर्यंत प्रवेश होता. पोलिसांच्या आरोपानुसार, त्यांनी 294 प्रश्नांचा स्वतंत्र संच तयार करून तो एमपीएससीचे उपसचिव अभिजित लेंडवे यांच्याकडे दिला. त्यानंतर हा संच गोपाळ मराठेकडे गेला आणि मराठेने तो प्रवीण पाटीलपर्यंत पोहोचवल्याचा पोलिसांना संशय आहे.
एमपीएससीसारख्या महत्त्वाच्या संवैधानिक संस्थेच्या अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. परीक्षांची गोपनीयता, प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया आणि सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची चौकशी सुरू असून, पेपर नेमका कोणाकडून, कसा फुटला याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, तपासातून पुढे येणाऱ्या पुराव्यांच्या आधारेच या पेपरफुटीमागील नेमका कट, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि संपूर्ण साखळी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे स्पर्धा परीक्षार्थींसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

