मुंबई : आमदार रवींद्र फाटक यांनी आज (02 जुलै) विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे मुंबई लोकल मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुख्य मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर भाई जगताप, राजहंस सिंह, अनिल परब आणि प्रवीण पोटे यांनी उपप्रश्न विचारले.
तर सदस्य चित्रा वाघ यांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता लोकलच्या महिला डब्यांमध्ये रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पोलीस-गार्ड तैनात ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच यापूर्वी ही सुरक्षा केवळ सकाळी 6 वाजेपर्यंतच असायची, मात्र आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत ही वेळ आता 2 तासांनी वाढवली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत पोलिसांची ही वेळ वाढवण्यात यावी, या संदर्भामध्ये रेल्वेच्या जीएमला आम्ही पत्र लिहिलं होतं. कारण तीन वर्षापूर्वी सीएसएमटीवरून एक मुलगी क्लासला जात होती आणि तिला भायखळ्याला उतरायचं होतं. पण मधल्या स्टेशनवरती तिच्यावरती हल्ला करण्यात आला होता. घाबरून तिने चालत्या ट्रेनमधील उडी मारली. जर त्याचवेळी समोरून दुसरी ट्रेन आली असती, तर ती पोरगी तिथेच मृत्यूमुखी पडली असती. त्यामुळे सकाळी 6 नाही, तर सकाळी 8 वाजेपर्यंत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा तैनात केली जावी. तसेच डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरबाबत प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून तत्काळ निर्णय घेण्यात यावा. अजून जीव जाण्याची शासनाने वाट बघू नये. कारण मयंक नावाच्या मुलाचा जीव गेले. त्यानंतर माहिमला एका व्यक्तीवर हल्ला झाला. त्यामुळे माझी मागणी आहे की, अशा प्रकरणात मकोकासारखा कायदा लागू केला पाहिजे. फक्त कायदा लागू झाला नाही पाहिजे तर तो दिसला पाहिजे. अशा आरोपीला फाशी होणं गरजेचं आहे. कारण एका मुलाचा जीव घेतलाय त्याने. त्यामुळे अशा पद्धतीची शिक्षा आरोपीला शासन देणार का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला.
यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 पर्यंत आपण सुरक्षा देत आहोत. ती आता 8 वाजेपर्यंत करावी, अशी जी सूचना करण्यात आली आहे, ती चांगली आहे. त्यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. दुसरं म्हणजे मकोकासारखे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जर कायद्यामध्ये तशी तरतुद असेल किंवा ज्या-ज्या वेळेस आपण गुन्हेगारांना पकडतो आहे, तर त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी जो कायदा आहे, त्या कायद्यानुसार कारवाई आपण करत असतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार तशी कारवाई केली जाईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.
गर्दुल्ल्यांचा उपद्रव आणि अमली पदार्थांविरोधात कडक पावले उचलणार
इतर सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना योगेश कदम म्हणाले की, रेल्वे स्थानक आणि परिसरात वाढणाऱ्या गर्दुल्ल्यांच्या उपद्रवावर आणि ड्रग्जच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने निश्चित कालमर्यादा आखली आहे. रेल्वे पोलिसांच्या आयुक्तांसोबत येत्या 15 दिवसांत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीनंतर स्थानक परिसरात ड्रग्ज पुरवठा नक्की कुठून होतो, याचा शोध घेतला जाईल. तसेच, पुढील 25 दिवसांत अशा संशयित आणि उपद्रवी घटकांचा पूर्वेतिहास तपासून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश कदम यांनी दिले.
रेल्वे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न सुरू
योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, मुंबई उपनगरीय लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी असून यातून दररोज सुमारे 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून गांभीर्याने प्रयत्न सुरू आहेत. तसेच अपघात कमी करण्याच्या उद्देशाने लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकल 15 डब्यांच्या करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत सकारात्मक पावले उचलली जात आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.

