मुंबई : मुंबईचा विकास करण्याच्या नावाखाली आता आणखी एक टेंडर काढण्यात आले आहे. यात महापौर बंगल्याच्या बाहेरील बाजूला सुविधा पुरवण्यासाठी तब्बल 2 कोटी 89 लाखांचे टेंडर काढले आहे. गंभीर बाब म्हणजे या आधी अवघ्या चार महिन्यात महापौरांच्या भायखळा बंगल्यावर तब्बल 4 कोटी 15 लाख रुपयांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.
अवघ्या सहा महिन्यात तिसरे टेंडर काढल्यामुळे हा महापौरांचा बंगला आहे की ब्रिटनच्या महाराणींचा पॅलेस, असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत.
मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या मुदत ठेवी विकासासाठी मोडल्या जात आहेत. त्यावरून विरोधक महापालिका आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेला जाब विचारत आहेत. अशातच महापौर रितू तावडे यांच्या महापौर बंगल्याच्या सुभोभिकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याने मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. भायखळा येथील महापौर बंगल्यात नवीन महापौर वास्तव्याला येण्यापूर्वी 75 लाख रुपयांचा दुरुस्ती, सुभोभिकरण आणि इतर कामांवर खर्च करण्यात आला होता. हे कमी म्हणून की काय स्थायी समितीने नंतर 3 कोटी 40 लाख रुपयांच्या बंगल्याच्या नूतनीकरण प्रस्तावाला मंजुरी दिली. त्याप्रमाणे ती कामेही करण्यात आली.
आधीच 4 कोटी 15 लाख रुपयांचा खर्च केलेला असताना आता बंगल्या बाहेरील परिसराचे सुशोभीकरण आणि विकास करण्यासाठी 2.89 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या कामात ई. एस. पाटनवाला रोडलगत वाहतुकीचा आवाज कमी करण्यासाठी नॉइज बॅरिअर उभारणे, पर्जन्यजल वाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या टाकणे, इंटरलॉकिंग काँक्रीट पेव्हर्स तसेच भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. अवघ्या सहा महिन्यात महापौर बंगल्यात 7 कोटी रुपयांचा खर्च करण्याची वेळ का आली, मुळात खर्चाची किती गरज आहे, असे प्रश्न विचारले जात आहे. यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. महापौरांच्या बंगल्याचे क्षेत्रफळ 6 हजार चौरस फूट आहे. सुशोभीकरणावर एवढा प्रचंड खर्च का करावा लागत आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

