Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत ड्रग्ज फ्री अभियानाला सुरुवात, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली अंमली पदार्थमुक्तीची शपथ

मुंबईत ड्रग्ज फ्री अभियानाला सुरुवात, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली अंमली पदार्थमुक्तीची शपथ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'नशामुक्त भारत'च्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 'ड्रग्ज फ्री मुंबई', 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्र' आणि 'ड्रग्ज फ्री भारत' घडविण्याचा सामूहिक निर्धार आपण सर्वांनी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याने यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज वरळी डोम येथे 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, समितीच्या अशासकीय सदस्य सपना श्रॉफ, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय तज्ज्ञ, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या युवा शक्तीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवून भारताला आतून कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. ड्रग्ज हे या छुप्या युद्धातील सर्वात धोकादायक शस्त्र असून, त्याविरोधातील लढा प्रत्येक नागरिकाने स्वतःचा समजून लढला पाहिजे. अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी पोलीस, आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण विभाग, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. ड्रग्जची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा संपूर्ण नायनाट केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तसेच, विद्यार्थ्यांनी स्वतः "ड्रग्जला नाही" असा ठाम निर्धार केल्यास कोणालाही त्यांना व्यसनाच्या आहारी नेता येणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढील दोन ते चार वर्षांत 'ड्रग्ज फ्री मुंबई'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक विद्यार्थी हा समाजाचे डोळे आणि कान असून, व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्या व्यक्तींबाबत तसेच ड्रग्सचा व्यापार करणाऱ्यांविषयी माहिती देण्याचे आवाहन यावेळी फडणवीसांनी केले. राज्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना याबाबत पत्र पाठविण्यात येणार असून, 'ड्रग्ज फ्री कॅम्पस' आणि 'ड्रग्ज फ्री स्कूल' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यास शासन पूर्ण सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. ड्रग्जविषयी माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल तसेच उपयुक्त माहिती देणाऱ्यांना पुरस्कारही दिले जातील, अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

व्यसनाधीन युवकांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वयाच्या 21 ते 22 वर्षांपर्यंत युवक व्यसनांपासून दूर राहिल्यास आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवकांनी व्यसनांना ठाम नकार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तर, यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत म्हटेल की, युवा शक्ती ही समाजासाठी विध्वंसक नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीची जीवनदायी शक्ती ठरली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने घेतलेली 'ड्रग्ज फ्री मुंबई'ची शपथ प्रत्येकाने प्रत्यक्ष कृतीत उतरवावी, असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्याची शपथ दिली.

यावेळी नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले की, युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकविण्याचा कट हाणून पाडण्यासाठी शासनाबरोबरच समाजानेही सक्रिय सहभाग घ्यावा. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती, समुपदेशन आणि व्यसन प्रतिबंधक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील प्रत्येक घटकाने मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. तर, केंद्र व राज्य शासन युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असून, येत्या 15 ऑगस्टपासून 'सीएम महाधन' कौशल्य विकास योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक लाख युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar