Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नादाला लागाल तर मार खाणार, अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा

नादाला लागाल तर मार खाणार, अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा

मुंबई : उपनगरातील विलेपार्ले पूर्वला असलेल्या साठ्ये महाविद्यालयातील मुख्य प्रवेशद्वारावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (MNVS) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात बुधवारी (19 ऑगस्ट) वाद झाला.

नवीन विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणी मोहिमेदरम्यान झालेल्या या वादाचे रुपांतर काही वेळातच हाणीमारीमध्ये झाले. ज्यानंतर महाविद्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहोचले. ज्यानंतर रात्री उशिरा दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडले. परंतु, आता या घटनेवरून महाराष्ट्र विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. अभाविपची विद्यार्थी सदस्य नोंदणी करणारे काही कार्यकर्ते हे मुलींवर हात टाकत होते. त्यामुळे जिथे नादाला लागणार तिथे मार खाणार, असा इशारा अमित ठाकरेंनी दिला आहे. गुरुवारी (20 ऑगस्ट) अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून मागील 15 दिवसांपासून विविध महाविद्यालयांमध्ये सदस्य नोंदणी अभियान सूरू आहे. साठ्ये कॉलेजमध्येही बुधवारी मनविसेकडून नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते. तर, त्याच दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून साठ्ये कॉलेजबाहेर सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. ज्यानंतर जागेवरुन आणि विद्यार्थ्यांना आपल्या बाजूला खेचण्यावरून या दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी आरोप करत म्हटले की, एबीव्हीपीचे कार्यकर्ते साठ्ये कॉलेजमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बळजबरीने पकडून नेऊन त्यांची सदस्य नोंदणी करत होते. एवढेच नाही तर विद्यार्थिनींना जबरदस्तीने हात धरून त्यांना नेले जात आहे आणि त्यांची नोंदणी केली जात होती. तर, हा विषय आता पूर्णपणे संपला असून या घटनेचा कोणताही संघटनात्मक किंवा वैयक्तिक वाद म्हणून अर्थ काढू नये, असे अभाविपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, यावर आता मनविसे अध्यक्ष अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, महाविद्यालयाच्या आतमध्ये किंवा गेटवर स्टॉल लावू नयेत, असे सांगितले आहे ना. आम्ही बाहेर स्टॉल लावतो. मग तरीही अभाविपने गेटवर स्टॉल लावला. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते मुलींना हात धरुन घेऊन चालले होते, असे मला कळले. तुम्ही मुलींचा हात धरल्यावर आम्ही मारणार. तुमची भाजपची संघटना आहे, जी भाजप सत्तेत आहे, तुम्ही विद्यार्थ्यांसाठी चांगली कामे करू शकता, ती करत नाही त्यामुळे या गोष्टी करायची गरज पडते. मुलींवर हात टाकल्यावर तुम्हाला मारणारच, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. तर, अभाविप संघटनेला आता विद्यार्थ्यांमध्ये किंमत उरलेली नाही. जिकडे जिकडे तुम्ही राडा करणार, तिकडे मार खाणार तुम्ही. तुम्हाला काम करायची ती नीट करा, आम्ही मध्ये येणार नाही. पण तुम्ही जबरदस्तीने कोणाला सभासद करत असाल तर, आम्ही मध्ये पडणार, असा इशाराही अमित ठाकरेंनी दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar