नवी मुंबई : प्रतिनिधी 'अल-निनो' मुळे उदभवणारे पाणी संकट हे सध्या भारत आणि विशेषतः महाराष्ट्रासमोर उभे ठाकलेले एक मोठे आवाहन आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत १० टक्के पाणी कपतीचे नियोजन करण्याच्या सूचना सर्वच महापालिकांना केल्या आहेत.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शुक्रवारी (ता.२३) झालेल्या सर्वसाधारण सभेत (महासभा) सदस्यांनी आपल्या सूचना आणि काही मागण्या महापौर सुजाता पाटील आणि प्रशासनाकडे केल्या. यावेळी नवी मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्यात कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडली.
नवी मुंबईतील पाणीसाठा पूर्णपणे पुरेसा नसल्याने उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज आहे. त्यामुळे उद्याने, गाड्या धुणे, सर्व्हिस सेंटर, बांधकामे, अनधिकृत पाणीवापर आणि पाणीगळती यावर नियंत्रण आणण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच व्हावा, यासाठी विशेष नियोजन केले जाणार असून, पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात येईल. या प्रक्रियेवर नगरसेवक लक्ष ठेवतील आणि नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे सागर नाईक यांनी सांगितले.
पालिकेच्या सभागृहात पाण्यावरून चर्चा रंगली : उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात येईल, पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरल्या जाणार्या पाण्यात कपात केली जाईल, असे नाईक स्पष्ट केले. पाणीगळती रोखणे, पुनर्वापर वाढविणे आणि भविष्यातील जलस्रोत विकसित करणे या विषयावर सर्वच पक्षाच्या सदस्यांनी आपली मते मांडणी.त्याला पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उत्तरे देत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या संकटावर मत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा… मुंबईस्थित कंपनीविरोधात बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल, CBI चे अनेक शहरांत छापे
पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी पुनर्वापर करता येणार्या पाण्याचा वापर वाढविण्यावरही महापालिका भर देणार आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी उद्याने, बोअरवेलशी संबंधित वापर आणि इतर योग्य कामांसाठी वापरणे, उद्यानांमध्ये पाण्याच्या टाक्या बसविणे, तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. ग्रे वॉटरच्या पुनर्वापरासाठीही आवश्यक पावले उचलली जातील. या योजनांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल, असे सागर नाईक यांनी स्पष्ट केले.
तीन वर्षांत पोशिर धरण नवी मुंबईकरांना आवश्यक असलेले पाणी उपलब्ध असताना केवळ शासनाच्या १० टक्के कपातीच्या सूचनेमुळे त्यांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची गरज नाही. नवी मुंबईकरांना आतापर्यंत मिळत असलेले पाणी यापुढेही मिळत राहील आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्यात कोणतीही कपात होणार नाही.
भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी वॉटर प्रेशर रेग्युलेशन मॅनेजमेंट प्रणाली राबविण्यात येणार आहे. फ्ले मीटरच्या माध्यमातून प्रत्येक घराला दररोज किती पाणीपुरवठा होतो आणि किती पाणी वापरले जाते, यावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन आहे. तसेच, पोशिर धरणाच्या कामाला सुरुवात झाली असून, धरणासाठी आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन वर्षांत धरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
-सागर नाईक,
सभागृह नेते-नवी मुंबई महानगरपालिका

