Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
NCP सोडल्यावर शरद पवार अहिरांकडे ढुंकूनही पाहत नव्हते, आता आदित्यंसोबत विश्वासघात केला, राऊतांनी सडकून काढलं

NCP सोडल्यावर शरद पवार अहिरांकडे ढुंकूनही पाहत नव्हते, आता आदित्यंसोबत विश्वासघात केला, राऊतांनी सडकून काढलं

मुंबई : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे राजकारण्यांना नशामुक्ती केंद्रात भरती करणे ही भारतीय लोकशाही आणि संविधानाची गरज आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांनाही अशाच प्रकारच्या उपचारांची गरज आहे, पण दिल्लीतील हे दोन्ही नेते उपचार करण्याच्या पलीकडे पोहोचले आहेत.

आमदार, खासदार विकत घेण्याचे, पक्ष फोडण्याचे व त्यानंतर पत्रकार परिषदेत रावणाप्रमाणे विकट हास्य करण्याचे व्यसन या सगळ्यांना जडले आहे. आमदार फोडायचे व पत्रकार परिषदेत विकट-विकृत हसत दाढीवर हात फिरवायचा. हा रोग आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी 'सामना'च्या रोखठोक सदरातून केली आहे.

संजय राऊतांनी रोखठोक सदरात काय म्हटलं?

शिवसेनेचे सहा खासदार फोडले, आता आमदार सचिन अहिर गेले. सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेत आले (फोडले) ते काही संत-सज्जनांचे कार्य पुढे नेण्यासाठी नक्कीच नाही. अहिर यांना पवारांनी सर्व काही दिले. मानप्रतिष्ठा, सत्ता, सुरक्षा. तरीही ते फुटले तेव्हा शिवसेनेत आनंदाचे वातावरण होते. अहिर फुटले तेव्हा दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू होते. अहिर फुटले व शिवसेनेत आले हे मी श्री. पवार यांना सांगितले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मला जाणवली. "मी त्याला काय द्यायचे बाकी ठेवले होते? सर्व काही दिले," असे ते म्हणाले. पुढे अनेक दिवस सार्वजनिक कार्यक्रमांत पवार हे सचिन अहिर यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. त्यांच्या दृष्टीने तो विश्वासघात होता. तोच विश्वासघात अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत केला. फडणवीस-शिंदे यांचे राजकारण हे विश्वासघातकी, बेइमान निर्माण करण्याचे आहे. त्यामुळे राज्यात विश्वासघाताचे पीक ते काढत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून कामकाजावर लक्ष

अहिर यांच्यासारख्यांमुळेच राजकारण अडते व शिवसेनेसारखे पक्ष थांबतात असे ज्यांना वाटते त्यांची चूक मोठी. शिवसेनेचे संघटन आजही भक्कम आहे व ते आयाराम-गयाराम यांच्यासारख्यांमुळे नाही, तर सामान्य जनता व शिवसैनिकांच्या पाठबळामुळेच ते आजही भक्कम आहे. सचिन अहिर यांचा पराभव वरळी मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी केला होता तेव्हाच अहिर यांच्या राजकीय कारकीर्दीस पूर्णविराम लागला होता. मात्र शिवसेनेने अहिरांना जीवदान दिले, आमदार केले. ते अहिर यापुढे ठाकरे व शिवसेनेविरुद्ध उभे ठाकतील.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण नासवायला निघाले आहेत. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. एकनाथ शिंदे हे व्यक्तिगत द्वेषाने पछाडले आहेत व या द्वेषाला काडी लावण्याचे काम दिल्लीतील त्यांचे मालक रोज करत आहेत. महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृतीशी या लोकांना काहीच देणेघेणे नाही. महाराष्ट्र पूर्णपणे बुडवायचे काम दिल्ली करत आहे व दिल्लीला रसद पुरवण्याचे काम फडणवीस, शिंदेंसारखे मराठी राजकारणी करत आहेत. या पापात सहभागी होणाऱ्यांना कोणताही स्वाभिमान राहिलेला नाही.

फडणवीस यांच्या भोवती व्यापारी, बिल्डर आणि शिंदे यांच्या भोवती ठेकेदार व गुंड टोळ्या उघडपणे घेराबंदी करून उभ्या आहेत. सत्ता याच टग्यांसाठी राबवली जात आहे. जे खासदार फुटले त्यांनी असे कोणते राष्ट्रीय सुरक्षेचे कार्य केले की, त्यांना सशस्त्र पोलीस गाड्यांची सुरक्षा सरकारने द्यावी? हे खासदार शिवसेनेत असताना मुख्यमंत्री फडणवीस त्यांना भेटत नव्हते, निधीचा दमडा देत नव्हते, मात्र तेच खासदार 'फुटून' शिंदेंकडे जाताच मुख्यमंत्री त्यांना स्वतःच्या चेंबरमध्ये बोलवून सन्मानाने निधी देतात. जणू हा निधीचा पैसा शिंदे-फडणवीस स्वतःच्या शेतातून निर्माण करतात. बेइमानीला हे उघड उत्तेजन आहे.

सचिन अहिर हे 30 जूनला सकाळी 11.30 पर्यंत शिवसेनेच्या बाकावर बसले. तेथून उठले व शिंदे गटातर्फे उपसभापतीपदाचा अर्ज भरायला निघाले तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या बेइमान वरातीत सामील झाले. छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राला हे लोक कोणता संदेश देत आहेत? महाराष्ट्र आता स्वाभिमान्यांचा राहिला नसून बेइमान लोकांचा झाला आहे आणि सरकार या बेइमानांच्या पाठीशी ठाम उभे आहे.

एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर चक्क दरोडा घातला. अमित शहा हे त्या दरोड्याचे खरे सूत्रधार. शिंदे यांचे विश्वासघाताचे राजकारण पैशांवर व अमित शहांच्या पाठिंब्यावर सुरू आहे. या अनैतिक कार्यास ते हिंदुत्वाचा मुलामा देत आहेत. शिंदे यांनी आधी स्वतःचा पक्ष काढावा व मग हिंदुत्व, स्वाभिमानाच्या गप्पा माराव्यात. शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन शिंदे गटाने साजरा केला. ही दिवाळखोरी आहे.

त्याआधी अमित शहांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात शिंदे यांना एकमेव शिवसेनाप्रमुख म्हणून घोषित केले व महाराष्ट्र, मराठी माणसाची थट्टा केली. सत्य असे की, शिंदे यांचा एक गट आहे व तो साडेतीन वर्षांचा आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांची ही अनौरस संतती आहे. ही अनौरस संतती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या संस्काराचा पाया उखडून टाकत आहे. अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचे आहे व एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांचा रस्ता अनैतिक व भ्रष्ट आहे. ते धावत आहेत, धावत राहतील.

सरकारकडून कांदा खरेदी दरात 250 रुपयांची वाढ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar