Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नोकरी मागणारे नको, देणारे बना, रत्नागिरीत मंत्री उदय सामंत यांचे विधान; 2159 कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक

नोकरी मागणारे नको, देणारे बना, रत्नागिरीत मंत्री उदय सामंत यांचे विधान; 2159 कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक

त्नागिरी : तरुणांनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना' आणि केंद्राच्या 'विश्वकर्मा योजने'चा लाभ घेऊन स्टार्टअप्स उभारावेत आणि नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बनावे, असे आवाहन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी तरुणांना केले.

कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे. 'जिल्हा गुंतवणूक परिषद 2026' च्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 2 हजार 159 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणार्‍या 100 कोटींच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

कार्यक्रमात बोलताना उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीचा जीडीपी गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत 2,159 कोटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प 100 टक्के पूर्ण करून पुढील वर्षी 5 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू. विमानतळापासून 2 किमी, शहरापासून 3 किमी आणि समुद्रापासून अवघ्या 1 किमी अंतरावर एमआयडीसीच्या जागेत एक्सप्रेस ग्रुप पंचतारांकित हॉटेल उभारणार आहे. जयगड येथे उभारण्यात येत असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या पंचतारांकित हॉटेलचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून ते लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. रत्नागिरी विमानतळाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 'एटीआर' प्रवासी विमान उड्डाण घेईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

स्टील, सेमीकंडक्टर, नव्या एमआयडीसींना गती

जिल्ह्यात रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा यावेळी करण्यात आली. येत्या 7, 8 आणि 9 सप्टेंबरला जिल्ह्यात स्टील उद्योगाचा मार्ग मोकळा होत असून, यामुळे किमान 10 ते 12 हजार स्थानिकांना रोजगार मिळेल. 'व्हीआयटी'कडून जमीन काढून ती 'आरआरपी' या सेमीकंडक्टर कंपनीला दिली जात आहे. निवेंडी, वाटद आणि मेर्वी येथे नव्या प्रदूषण विरहित एमआयडीसी उभारल्या जात आहेत, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar