सुनील मेहरोत्रामुंबई : पाकिस्तान सरकार मुंबईतील पारशी समाजातील दोन डॉक्टरांना (एक फिजिशियन आणि एक रेडिओलॉजिस्ट) आपला सर्वोच्च नागरी सन्मान 'निशान-ए-इम्तियाझ' प्रदान करणार आहे.
मुंबईतील दोन डॉक्टरांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या जीवघेण्या आणि असाध्य आजाराची माहिती गुप्त ठेवली होती. पाकिस्तानचे असे मानणे आहे की, जर जिनांच्या गंभीर आजाराची माहिती त्या वेळी सार्वजनिक झाली असती, तर त्याचा थेट परिणाम 1947 मधील पाकिस्तानच्या निर्मिती प्रक्रियेवर झाला असता.
एका वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे या निर्णयाची घोषणा केली. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने नागरी आणि लष्करी सन्मानांची घोषणा केल्यानंतर इक्बाल यांचे हे विधान आले आहे. आपल्या पोस्टमध्ये इक्बाल यांनी नमूद केले की, पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून मुंबईतील पारशी समाजातील या दोन असाधारण डॉक्टरांची 'निशान-ए-इम्तियाझ'साठी शिफारस करण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या मते, या डॉक्टरांनी 'कायद-ए-आझम' मोहम्मद अली जिना यांच्या अंतिम आजारपणाची माहिती अत्यंत प्रामाणिकपणे आणि गोपनीयतेने जपली होती.
इक्बाल यांनी नमूद केले की, त्या वेळी जिनांच्या गंभीर प्रकृतीचा खुलासा झाला असता, तर पाकिस्तानच्या निर्मितीची प्रक्रिया धोक्यात आली असती. त्यांनी दावा केला की, अनेक इतिहासकार या घटनेला विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या गुप्त गोष्टींपैकी एक मानतात. ब्रिटिश भारतातील शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनीही नंतर कबूल केले होते की, जर त्यांना जिनांच्या आजाराच्या गांभीर्याची कल्पना असती, तर त्यांनी फाळणीला विलंब लावला असता. तसे झाले असते, तर इतिहासाची दिशा बदलली असती आणि पाकिस्तानच्या निर्मितीवर परिणाम झाला असता.
पाकिस्तानी मंत्र्यांच्या मते, आपल्या व्यावसायिक शपथ आणि गोपनीयतेचे कर्तव्य पाळून या दोन डॉक्टरांनी अशी सेवा बजावली, ज्याचा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या अस्तित्वावर खोलवर परिणाम झाला. मात्र, अहसान इक्बाल यांनी अद्याप या दोन डॉक्टरांची नावे जाहीर केलेली नाहीत. तसेच, त्यांच्या वतीने हा सन्मान कोण स्वीकारणार, हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. पाकिस्तान सहसा 14 ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्यदिनी नागरी आणि लष्करी पुरस्कारांची घोषणा करते. या पुरस्कारांचा अधिकृत प्रदान सोहळा त्यानंतरच्या म्हणजे पुढच्या वर्षी 23 मार्च रोजी म्हणजेच 'पाकिस्तान दिना'च्या निमित्ताने राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो.
जिन्ना यांना क्षयरोग (टीबी) झाला होता. त्या काळी हा आजार अत्यंत गंभीर आणि जीवघेणा मानला जात असे. ऑगस्ट 1947 मध्ये पाकिस्तानच्या निर्मितीनंतर साधारण वर्षभराने त्यांचे निधन झाले. पाकिस्तानात त्यांना 'राष्ट्रपिता' (फादर ऑफ द नेशन) मानले जाते. यापूर्वी, 1998 मध्ये पाकिस्तान सरकारने भारतीय अभिनेते दिलीप कुमार यांनाही 'निशान-ए-इम्तियाझ' या पुरस्काराने सन्मानित केले होते.

