पालघर: पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात पालघर पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार असलेले आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना मिरारोड येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिरारोड परिसरातील जीसीजीसीजी क्लबमधून रोहित गावित यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदारपुत्र रोहित गावित यांच्यासह 14 आरोपींचा पालघर पोलिसांकडून शोध सुरू होता. फरार आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली होती. अखेर या कारवाईत रोहित गावित यांना मिरारोड परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याने या प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. रोहित गावित यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या मारहाण प्रकरणात इतर सहभागी आरोपींमध्ये समाविष्ट असलेल्या गोविंदा पथकातील 9 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. हे आरोपी मुख्य आरोपी नसून घटनेत सहभागी असलेल्या इतर आरोपींपैकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे. फरार असलेल्या उर्वरित आरोपींचा शोध पालघर पोलिसांकडून सुरू असून, रोहित गावित यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील नेमकी पार्श्वभूमी आणि प्रत्येक आरोपीची भूमिका तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

